बाबा तू लढ; मी घरात राहून पुस्तक वाचेन!

रजनीकांत साळवी
गुरुवार, 23 एप्रिल 2020

मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी परिसरात कर्तव्यावर असलेल्या आपल्या पोलिस बाबाला स्पृहा परब या चिमुरडीने जागतिक पुस्तक दिनी केलेल्या भावनिक आवाहनाने तिचे बाबाही भावूक झाले. खरंतर स्पृहाला पुस्तक दिनाची पुसटशीही कल्पना नाही; मात्र कॉमिकची आवड असल्याने कार्टून मालिका अथवा पुस्तक मिळाले की, त्यात ती रमून जाते, असे स्पृहाचे पोलिस बाबा किरण परब यांनी सांगितले. 

प्रभादेवी (मुंबई) : "बाबा, तू कोरोंनाशी लढ..मी घरात राहून पुस्तक वाचेल...', ही वाक्‍ये आहेत 5 वर्षीय स्पृहा परब हिचे. मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी परिसरात कर्तव्यावर असलेल्या आपल्या पोलिस बाबाला या चिमुरडीने जागतिक पुस्तक दिनी केलेल्या भावनिक आवाहनाने तिचे बाबाही भावूक झाले. खरंतर स्पृहाला पुस्तक दिनाची पुसटशीही कल्पना नाही; मात्र कॉमिकची आवड असल्याने कार्टून मालिका अथवा पुस्तक मिळाले की, त्यात ती रमून जाते, असे स्पृहाचे पोलिस बाबा किरण परब यांनी सांगितले. 

क्लिक करा : वाईन शॉप सुरू करा; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंकडी मागणी

देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मुंबईत वरळी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडल्यानंतर तो भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला. याच वरळीत पोलिस हवालदार किरण परब कर्तव्य बजावत आहेत. सकाळी 8.30 ला घर सोडल्यानंतर रात्री 9-10 वाजेपर्यंत ते घरी पोहोचतात.

अशा परिस्थितीत कर्तव्यावर असताना दुपारी मुलीचा फोन आला की पुन्हा रिफ्रेश झाल्यासारखे वाटते, असे ते सांगतात. दुपारी जेवाणाची वेळ झाली की, स्पृहा न चुकता आपल्या बाबाला फोन करते. तिच्या बोबड्या आवाजात जेवणापूर्वी तू सॅनिटायझर लावले का, हातात ग्लोव्हज घातले का, हात साबणाने स्वच्छ धुतले का, असे एक ना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडते आणि खबरदारी घेण्याचा सल्ला देत असल्याचे किरण परब सांगतात. 

लाडक्‍या बाबाला चिमुकल्या हातांची साथ 
गेल्या महिना-दीड महिन्यांपासून खबरदारी म्हणून किरण परब हे घरी आल्यावर विलगीकरण करून घेतात. त्यामुळे स्पृहा त्यांना दुरूनच भेटते. या कालावधीत ती टीव्हीवरील कॉमिक पाहणे, कॉमिकची पुस्तके चाळणे हा छंद जोपासत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात आपला बाबा लढत आहे. हे समजल्यावर तिनेही समजदारीची भूमिका घेतली आणि आपल्या बाबाला या लढाईत साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. 

क्लिक करा : सावधान! तंबाखूच्या थुंकीतूनही होतो कोरोनाचा प्रसार

आपण नक्की यशस्वी होऊ 

  • एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या आकांक्षा नागवेकर यांना सकाळ आणि दुपार आशा दोन सत्रात काम करावे लागते. त्यामुळे घरी आराध्य या लहान भावाची जबाबदारी त्यांची मुलगी भूमी हिने घेतली आहे. भूमी आपल्या भावाचा अभ्यास देखील घेत आहे.
  • तर, गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या आपल्या बाबांशिवाय एक क्षणही न राहणारी 6 वर्षीय अदिती गोडे देखील कोरोनाच्या या लढाईत समजूतदारपणाची भूमिका घेत आपल्या बाबाला साथ देत आहे. आपण यात नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास ती बोबड्या स्वरात बोलून दाखवते. सध्या ती चित्र रेखाटण्यात मग्न; कधी कधी "सकाळ'च्या बालमित्र अंकातील चित्र रंगवण्यात, तर कधी स्टोरी बुक वाचण्यात मग्न असते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Baba you fight; I will stay at home and read a book'