मुंबईत परतलो, पण जेवणाचे काय? अनलॉकमुळे परतलेल्या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट

मुंबईत परतलो, पण जेवणाचे काय? अनलॉकमुळे परतलेल्या कष्टकऱ्यांची परिस्थिती बिकट



मुंबई  : कोरोना संकटामुळे सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून तीन महिने हाताला कोणतेच काम नव्हते.  त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यात कोरोनाची दहशत असल्याने जूनमध्ये उत्तर प्रदेशातील गाव गाठले. पण, तेथेही पोटा पाण्याची सोय झाली नाही. वाचवलेले तेवढे सगळ संपले. व्याजाने पैसे घेऊन पुन्हा मुंबईत आलो. पण, येथेही पुर्वीच्या तुलेनेने अर्धेही काम मिळत नाही. ही आहे, मालवणीतील ‘गारमेंट फॅक्टरी’त टेलरींगचे काम करणाऱ्या शफिक सिध्दीकी याची. एक - दोन पिढ्यांपासून मुंबईत राहाणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालवून किंवा लहानमोठे उद्योग करणाऱ्या प्रत्येकाची हिच बिकट परिस्थिती असून अनलॉकमध्ये मुंबईत दोन वेळच्या जेवणाचा संघर्ष सुरू आहे. 

आई, वडील, बहिण, पत्नी आणि मुलगी अशा मोठ्या कुटुंबाची शफिकवर जबाबदारी आहे. लॉकडाऊनच्या काळात कामच नसल्याने बचतीतून घर चालवले. पण, ती बचत दोन तीन महिन्यात संपली. स्वत: एकवेळचे जेवण करू शकतो. पण आई, वडील मुलीला कसे उपाशी ठेवणार? गावात काम नव्हते. म्हणून चार दिवसांपुर्वी मुंबईत आलो. पुर्वी रोज ४०० ते ५०० रुपयांचे काम करायचो. कधी कधी अधिक मोबदल्याचे काम करत होतो. पण, आता खूप कमी काम मिळते. व्याजाने पैसे घेऊन मुंबईत आलो आहे. आता ते कर्ज तर फेडायचेच आहे. पण, संपलेली बचत पुन्हा उभारून रोजचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्‍नही शफिकला आल्या दिवसापासून सतावतोय. 
शफिक हा स्थालांतरीत कामगार १५-१६ व्या वर्षी मुंबईत आला.  घाटकोपरमध्ये राहणाऱ्या राहूल माळवे या तरुणालाही हाच पेच पडला आहे. त्याचे कुटुंबिय तीन पिढ्यांपासून या शहरात राहते. राहुलची एक लहानसा छपाईचा व्यवसाय  आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे महिने व्यवसायासाठी चांगले असतात. या काळात छापखान्याचे किमान ७-८ महिन्याचा  भाड्याचा खर्च निघून वर फायदाही होता. मात्र, या काळातच काम बंद झाल्याने गेल्या पाच महिन्या पासून जागा मालकाला अर्धच भाडे दिले आहे. आताही काम नाही. त्यामुळे किती महिने निम्म्या भाड्यावर दिवस ढकलणार हा राहूल माळवेला पडलेला प्रश्‍न.बचतीवर जगतोय पण आता जास्त दिवस असे राहाता येणार नाही. वरळी येथील टॅक्सी चालक चेतन यांचीही परीस्थिती अशीच आहे. तीन महिन्यांनी टॅक्सी सुरु केली. पण, आजच्या निर्बंधामुळे पुर्वी सारखा व्यवसाय नसल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात गाडीच्या कर्जाचे हप्ते भरले नाहीत. त्यांच्या मागे आता बँका लागल्या आहेत. पण, दोन वेळच्या जेवणाची कमाई होणे अवघड आहे. मुलांच्या शाळा इतर खर्च आहे. आता याचे हप्ते कसे देणार असा प्रश्‍न चेतन याला सतावतो. कोव्हिड पेक्षा आता पोटाची भिती वाटू लागली आहे. विक्रोळी येथील एक रिक्षावालाही अशीच व्यता मांडतो. बँक हप्त्यासाठी मागे लागली आहे. पण, पैसेच नाही तर देणार कोठून असा त्याचा प्रश्‍न.

घाटकोपर येथे ३० वर्षांपासून चहा विक्रीचा व्यवसाय करणारे गोविंद तांडेल यांची परिस्थिती काही वेगळी नाही. घाटकोपरच्या सहकार बाजारात यांचा व्यवसाय आहे. पण, आता चहा पिण्यासाठी पुर्वीसारखी गर्दी होत नाही. पुर्वीच्या तुलाने १०-२० पैशांचा व्यवसाय होत आहे. लॉकडाऊनच्या काळात किटलीतून चहा विकाला. आता वयाच्या साठीत जास्त फिरणेही शक्य नव्हते. त्यामुळे एका जागेवरुनच चहा विकायाचो. दहा पंधरा दिवसांपुर्वी दुकान सुरु केले. पण, दिवसभर मेहनत करुन फक्त जेवणाची सोय होते एवढेच. जागेच्या भाड्याचा प्रश्‍न आहेच, असे ते सांगतात.
लॉकडाउननंतर त्यांच्या गावी गेलेले 20 ते 25 लाख कामगार मुंबईत पुन्हा  परतले आहेत. हे कामगार प्रामुख्याने बांधकाम, लहान मोठे कारखाने, वेठबिगारीवर जगतात. पण सर्वांचीच परिस्थिती सारखी आहे. मालाला उठाव नसल्याने कारखान्यात पुर्वी सारखे काम नाही. तर वेठबिगारी करणार्यांना तर दोन चार दिवसांनी काम मिळत आहे. 

रिक्षा, टॅक्सीचालकांना भ्रांत
मुंबईतील 45 हजार टॅक्सीमुळे चालक आणि मालकासह 1 लाखापेक्षा अधिक जणांचे कुटुंब चालते. तर, 2 लाख रिक्षावर  3 लाखाच्या आसपास मालक आणि चालकांचे पोट आहे. मात्र, या व्यवसायावार सध्या मंदी असून मालकाला गाडीचा हप्ता आणि चालकाला मालकाला शिफ्टचे पैसे देण्यासाठी तासनतास रस्त्यावर प्रवाशांची प्रतीक्षा करत उभे राहावे लागत आहे.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com