या रस्त्यावरून प्रवास केल्यास हाडे होतात खिळखिळी

पोलादपूर : भोगाव खुर्द येथील रस्त्याची झालेली दुरवस्था.
पोलादपूर : भोगाव खुर्द येथील रस्त्याची झालेली दुरवस्था.

पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूरपासून नऊ किलोमीटरवर भोगाव खुर्द गावाच्या हद्दीतील मोरीवरील रस्ता ९० ते १५० फूट अंतरापर्यंत खचलेला आहे. कशेडी घाटातून जाणाऱ्या या रस्त्याचे चौपदरीकरण आणि बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने येथून अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. त्यातच पावसाळ्यात हा रस्ता जास्त खचल्याने रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथे डांबरीकरण होणे आवश्‍यक असताना आतापर्यंत केवळ दगडमातीचा मुलामा करण्यात आला. डांबरीकरण केव्हा केले जाईल याच्या प्रतीक्षेत वाहनचालक आहेत. मात्र, या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

यावर्षी पावसाळ्यात भोगाव खुर्द गावाच्या हद्दीतील रस्ता जास्त खचल्याने वाहतूक पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यानंतर संबंधित खाते व प्रशासनाकडून एक ते दीड महिना युद्धपातळीवर काम करून मोठमोठे दगडमाती टाकून हे काम करण्यात आले. मात्र, हिवाळा संपत आला तरी अद्याप येथे डांबर टाकून सिलकोट करण्यात आले नाही. त्यामुळे या जीवघेण्या रस्त्यावरून आदळत आपटत प्रवास करावा लागत आहे. यात सरकारचे लाखो रुपये वाया जात असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. या ठिकाणी अवजड वाहने बंद पडत असल्याने अपघाताची शक्‍यताही नाकारताही येत नाही.

२००५ मध्ये झालेल्या आपत्तीनंतर सातत्याने रस्ता खचण्याचे प्रकार सुरू आहेत. अधूनमधून या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते; मात्र पावसाळ्याच्या दिवसात पुन्हा रस्ता खचतो. खचलेल्या रस्त्यावर वाहने आदळल्याने वाहनांच्या पार्टसह प्रवाशांनाही गचके सहन करावे लागत आहे. संबंधित खात्याच्या या अजब कारभाराबाबत वाहनचालक व प्रवासी, नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

केवळ दगडमातीचा भराव
कशेडी घाटातील या खचलेल्या रस्त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दोन वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली होती आणि तशा सूचना दिल्या होत्या; मात्र या ठिकाणी फक्त दगडमातीचा भराव टाकून वाहतूक सुरू करण्यात आली. येथे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. अनेकदा वाहनचालकांना आपला वेग कमी करावा लागत असल्याने वाहने नादुरुस्त होऊन बंद पडत आहेत. 

रस्ते विकासात प्रवाशांची हाडे खिळखिळी
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या मार्गाकडे होणारे दुर्लक्ष खेदजनक म्हणावे लागेल. या मार्गावरील बोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने अनेकदा दगड-माती यांची अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर येथून सुरू असते. परिणामी, या ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गाला पर्याय म्हणून बोगदा काढण्यात येत आहे. या मार्गाचे काम पोलादपूर हद्दीत सुरू करण्यात आले आहे; मात्र खचलेला रस्ता अद्याप खडीमय असल्याने प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com