मॉर्निंग वॉक! हवा बिघडली, ही आहेत धोकादायक ठिकाणे 

भाग्यश्री भुवड
Sunday, 10 January 2021

रस्त्यावरील वाढलेली वाहनांची गर्दी, अनलॉकनंतर सुरू झालेले कारखाने यामुळे वाढलेले प्रदूषण याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईच्या हवेवर झाला आहे.

मुंबई: रस्त्यावरील वाढलेली वाहनांची गर्दी, अनलॉकनंतर सुरू झालेले कारखाने यामुळे वाढलेले प्रदूषण याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईच्या हवेवर झाला आहे. त्यामुळे, मुंबईकरांनी प्रभात फेरी न करण्याचे आवाहन तज्ज्ञ मंडळी करत आहेत. शिवाय, ज्यांना अस्थमा, खोकला किंवा श्वास घेण्यास काही त्रास होत असेल तर त्यावरील उपचार लगेच घ्या असे आवाहन ही करण्यात आले आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्याने त्रस्त असलेल्या रुग्णांनी अति काळजी घ्या असा सल्ला ही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान मुंबईतील काही ठिकाणांमध्ये हवेचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. मुंबईतील पाच ठिकाणे सर्वाधिक वाईट हवेच्या विळख्यात आली असून मुंबई संपूर्ण शहराचा एक्यूआय दुपारपर्यंत 297 नोंदवण्यात आला. पीएम 2.5 ची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील लोकांना आरोग्य परिणामांचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे, सामान्य जनतेवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र वृद्ध लोकांना या वातावरणाचा धोका अधिक असू शकतो. 

मुंबईसह उपनगरीय शहरातील हवा गेल्या आठवड्याभरापासून जास्त प्रमाणात दूषित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईत वाईट हवेची नोंद केली जात आहे. शिवाय, वातावरणात बदल ही जाणवत आहेत. थंडीच्या वातावरणात मध्येच पावसाचाही अनुभव मुंबईकर घेत आहेत. याचा सर्व परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे. वातावरणात मध्येच थंडी, तर वाढलेल्या आर्द्रता अनुभवायला मिळत असताना गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा गुणवत्ता दर्जा खालावला आहे. 

मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) मध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळे शहरात वायू प्रदूषण वाढत असल्याची नोंद केली जात आहे. दरम्यान, मुंबई शहरातील पाच ठिकाणांचा हवेचा एक्यूआय वाईट नोंदवण्यात आला आहे. याचा अर्थ मुंबईची काही ठिकाणे सर्वाधिक वाईट हवेच्या विळख्यात आहेत. सफर या हवेचा गुणवत्ता दर्शवणाऱ्या प्रणालीने ही नोंद केली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईतील एक्यूआय "वाईट " राहण्याची शक्यता आहे अशी ही नोंद सफरवर करण्यात आली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पर्यावरण संरक्षण एजन्सी (ईपीए) च्यानुसार वायू प्रदूषण उच्च प्रमाणात दमा, सीओपीडी, हृदय रोग, कर्करोग, स्ट्रोक आणि कोविड- 19 अशा आजारांनी ग्रस्त लोकांना थेट परिणाम करते. 

हे परिसर धोकादायक

सफरने नोंदवलेल्या हवेच्या गुणवत्ता निर्देशकांनुसार, मुंबई संपूर्ण शहराची हवा वाईट नोंदवण्यात आली आहे. 297 एक्यूआय ची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कुलाब्यात एक्यूआय 332 नोंदवण्यात आला असून अतिशय वाईट पीएम 2.5 दर्जाची नोंद केली गेली आहे. मालाडमध्ये 332 एक्यूआय नोंदला गेला असून पीएम 2.5 अतिशय वाईट दर्जाची हवा आहे. बोरिवलीमध्ये 303 एक्यूआय नोंदला गेला असून अतिशय वाईट पीएम 2.5 नोंदवण्यात आला आहे. सफरने बीकेसीची हवा अतिशय वाईट दर्जात नोंदवली आहे. 336 एक्यूआय नोंदवण्यात आला असून पीएम 2.5 निर्देशांक आहे. चेंबूर आणि नवी मुंबईत वाईट दर्जाची हवा नोंदवली असून अनुक्रमे 266 आणि 297 एक्यूआय नोंदला गेला आहे. दरम्यान, अंधेरी या परिसरातील हवा अतिशय वाईट असून 312 एक्यूआय नोंदला गेला आहे. हवेचा गुणवता निर्देशांक पीएम 2.5 नोंदवण्यात आला आहे. 

या ठिकाणी मध्यम स्वरुपाची हवा
 
भांडूप मध्यम 114 एक्यूआय पीएम 10
माझगाव मध्यम 190 एक्यूआय पीएम 2.5
वरळी मध्यम 121 एक्यूआय पीएम 2.5

वायू प्रदूषणाचे काय परिणाम?

वृद्ध आणि मुले यांना विशेषत: वायू प्रदूषणाचा जास्त परिणाम होतो. शिवाय, सह-व्याधी, हृदयरोग, कर्करोगाचे रुग्ण, कोविड रूग्ण आणि सीओपीडी रुग्णांना जास्त धोका असतो. गंभीर लोकांव्यतिरिक्त, निरोगी लोकांना डोळ्यांमध्ये खाज सुटणे, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात.

हेही वाचा- Special Report: कोण आहे दिलीप छाबरिया?

आजार असलेल्या लोकांनी वेळेवर औषधे घेणे, चांगले आणि प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. आपल्या आहारामध्ये अधिक व्हिटॅमिन सी, गर्दीची ठिकाणे टाळा, बाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका, सामाजिक अंतर राखून ठेवा आणि वेळोवेळी आपले हात धुवा, असा सल्ला फोर्टिस रुग्णालयाचे मुख्य इंटेन्सिव्हिस्ट आणि फिजीशियन डॉ. संदीप पाटील यांनी दिला आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bad weather mumbai these are dangerous places for Morning walk


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad weather mumbai these are dangerous places for Morning walk