नागपाडा दुर्घटनेतील इमारत मालकाचा जामीन नामंजूर; खबरदारीअभावी घडली घटना

सुनिता महामुणकर
Saturday, 21 November 2020

ऑगस्ट महिन्यात नागपाडा येथे घडलेल्या इमारत दुर्घटना प्रकरणातील अटक इमारत मालकाला सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे.

मुंबई : ऑगस्ट महिन्यात नागपाडा येथे घडलेल्या इमारत दुर्घटना प्रकरणातील अटक इमारत मालकाला सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहत असले तरीही भाडेकरुंच्या सुरक्षेची जबाबदारी इमारत मालकावर असते, असे निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदविले आहे. 

हेही वाचा - भिवंडीतील आयजीएम रुग्णालय हायब्रीड; एकाच वेळी कोव्हिड, नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार

नागपाडामध्ये तीन महिन्यापूर्वी (27 ऑगस्ट रोजी) मिश्रा चाळ या इमारतीचा काही भाग कोसळला होता. यामध्ये नूरबानू कुरेशी (70) आणि त्यांची नात अरीशा (12) यांचा मृत्यू झाला होता. याबाबत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी इमारत मालक गुफरान कुरेशी (36) याला अटक केली. दोन मजली इमारतीचे दुरुस्ती काम सुरू असताना कुरेशी यांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, असा आरोप ठेवत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. इमारत दुरुस्ती काम कंत्राटदाराला देताना मालक म्हणून भाडेकरुंच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेणे ही कुरेशी यांची जबाबदारी होती. मात्र योग्य ती खबरदारी न घेण्यात आल्यामुळे ही दुर्घटना घडली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. भाडेकरू अवैधपणे राहत असले तरीही त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मालकावर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

हेही वाचा - ठाण्यातील वादग्रस्त सायकल स्टॅंडचा प्रस्ताव रद्द! सत्ताधारी शिवसेनेचा निर्णय

साक्षी पुरावे प्रभावित होण्याची शक्‍यता 
नागपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीचे बांधकाम 1940 मध्ये झाल्याने धोकादायक झाली होती. म्हाडाकडून तिच्या दुरुस्तीसाठी 2017 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते, मात्र न्यायालयीन दाव्यामुळे ते थांबले. त्यानंतर मागील वर्षी म्हाडाने तीन दिवसात इमारतीचे स्वतःहून काम करण्यास सांगितले, असे कुरेशीकडून सांगण्यात आले. मात्र म्हाडा संबंधित दाव्याबाबत कुरेशीकडून कागदपत्रे सादर केली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, जामीन मंजूर झाला तर साक्षी पुरावे प्रभावित होऊ शकतात, असे म्हणत न्यायालयाने जामीन नामंजूर केला. 

Bail denied to building owner in Nagpada accident The incident happened due to lack of caution

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bail denied to building owner in Nagpada accident The incident happened due to lack of caution