Lok Sabha Poll : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणजे खाण तशी माती; मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून गौरवोद्गार

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत डोंगराएवढी कामे केली असून शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच गुण तुमच्यात आले असून 'खाण तशी माती' याचे हे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काढले.
bala nandgaonkar over mp shrikant shinde kalyan lok sabha election
bala nandgaonkar over mp shrikant shinde kalyan lok sabha electionSakal

डोंबिवली - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत डोंगराएवढी कामे केली असून शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच गुण तुमच्यात आले असून 'खाण तशी माती' याचे हे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काढले. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाळा नांदगावकर बोलत होते.

तर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा डीएनए एकच असून मनसेने दिलेल्या पाठींब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचेच उमेदवार असल्याचे समजून काम करा, असे आवाहन यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

आपली महायुती लोकसभेप्रमाणेच विधानसभा आणि महापालिका यातही कायम राहिल्यास महाराष्ट्राला अपेक्षित असलेले चित्र नक्कीच दिसू शकेल, असा विश्वासही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

धर्मवीर आनंद दिघे आणि राजसाहेब ठाकरे यांचे वेगळे नाते होते. तसेच नाते आज राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे असून ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदींजींचे हात बळकट करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. तसेच ४ जून रोजी ज्यावेळेस कल्याण लोकसभेचा निकाल लागेल, त्यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांचाही त्यात तितकाच वाटा असेल, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

'एक ठाकरे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे पंजाला मत देणार!'

यावेळी बोलताना ज्या विचारांमुळे शिवसेना वाढली, ते विचार सत्ता आणि खुर्चीसाठी विकण्याचे काम शिल्लक सेनेच्या नेत्यांनी केल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. जे लोक सावरकरांना शिव्या देतात, त्यांचे शिवतीर्थावर स्वागत करण्याची नामुष्की यांच्यावर आल्याचे सांगत आज एक ठाकरे धनुष्यबाणाला,

तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मत देणार असल्याची घणाघाती टीकाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. कोरोनामध्ये राज्याला नेत्याची गरज होती, तेव्हा हे घरात बसून घोटाळे करत असल्याचे सांगत यांच्याकडे 'सिम्पथी' नव्हे, तर फक्त संपत्ती असल्याचा टोला खासदार शिंदे यांनी लगावला.

या मेळाव्याला मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहाराध्यक्ष राहुल कामत, ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, तसेच मनसेचे कल्याण लोकसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

'एकीकडे हिऱ्यापोटी गारगोटी.. दुसरीकडे खाण तशी माती!'

या मेळाव्यात बोलताना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुण दिसत असून हे गुण सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये दिसत नाहीत,

असे म्हणत आदित्य ठाकरेंना त्यांनी टोला लगावला. हाच धागा पकडून एकीकडे हिऱ्यापोटी गारगोटी, दुसरीकडे खाण तशी माती, असा टोला उद्धव ठाकरेंनाही त्यांनी नाव न घेता लगावला.

'डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचे उमेदवार आहेत, असे समजून काम करा!'

दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचेच उमेदवार आहेत, असे समजून काम करा, असे आवाहन यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी केले. आपण सर्वांनी जोमाने काम करायचे असून आपले काम ४ जून रोजी मतपेटीतून दिसले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com