खाद्यपदार्थांमधील हानीकारक अजिनोमोटोवर मुंबईत बंदी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

चायनीज खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारा अजिनोमोटो आरोग्यास हानीकारक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला. या ठरावानंतर महापालिकेने अडीच वर्षांपूर्वी मुंबईत अजिनोमोटोवर बंदी आणण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवले होते. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने शहरात अद्यापही सर्रासपणे अजिनोमोटोचा वापर होताना दिसत आहे.

मुंबई - चायनीज खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारा अजिनोमोटो आरोग्यास हानीकारक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला. या ठरावानंतर महापालिकेने अडीच वर्षांपूर्वी मुंबईत अजिनोमोटोवर बंदी आणण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवले होते. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने शहरात अद्यापही सर्रासपणे अजिनोमोटोचा वापर होताना दिसत आहे.

चायनीज फूडचे तरुणाईला आकर्षण असल्याने चायनीज पदार्थ मिळणाऱ्या अनेक ठिकाणी तरुणांची गर्दी असते. चायनीज पदार्थांची क्रेझ इतकी आहे की दिवसाही अनेक ठिकाणी चायनीज भेळ विकणारे स्टॉल उभे राहिले आहेत. पण या चायनीज खाद्यपदार्थांमध्ये मिठाऐवजी अजिनोमोटोचा वापर केला जातो. उपाहारगृहांमध्येही चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर होता. हल्ली फास्ट फूडमध्येही अजिनोमोटोचा वापर होतो. अजिनोमोटोमुळे हाडे ठिसूळ होऊन लठ्ठपणा येत असल्याने त्यावर बंदी आणण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली होती. त्यानुसार पालिकेच्या महासभेत ठराव करण्यात आला होता. अशा प्रकारे एखाद्या खाद्यपदार्थावर बंदी आणण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने अजिनोमोटोवर बंदी आणण्यासाठी ऑक्‍टोबर 2014 मध्ये अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवले. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पालिकेने केलेला पत्रव्यवहार पाहावा लागेल, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

अजिनोमोटो वापरण्यास एनएफएसएची परवानगी
अजिनोमोटोचे शास्त्रीय भाषेत मोनोसोडीयम ग्लुटामेट असे नाव आहे. काही वर्षांपूर्वी 'मॅगी'मध्ये शिशाबरोबर मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे 'मॅगी'वर बंदी आणली होती. मॅगीतील त्रुटी दूर केल्यानंतर त्यांना पुन्हा विक्रीस परवानगी देण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाने अजिनोमोटो प्रमाणात वापरण्यास परवानगी दिली असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Ban on harmful ajinomoto in Mumbai?