बांद्रा-कुर्ला संकुलात युतीचे वाक्‌युद्ध

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 डिसेंबर 2016

मुंबई - शिवस्मारकाच्या उद्‌घाटन समारंभानंतर बांद्रा-कुर्ला संकुलात झालेल्या जाहीर सभेला शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या तुंबळ वाक्‌युद्धाचे गालबोट लागलेच. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा शिवसेनेने सुरू करताच भाजपने "मोदी, मोदी' असे प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "शिवाजी महाराजांचे जे मावळे असतील त्यांनी शांत बसावे,' असे आवाहन करत प्रसंगाला गालबोट लागू नये असा प्रयत्न केला. पाचशे- सहाशे शिवसैनिक देत असलेल्या या घोषणा हळूहळू कमी झाल्या खऱ्या; पण शिवसेना- भाजपमध्ये एकजिनसीपणा नसल्याचे उघड झाले आहे.
मेट्रो प्रकल्पांच्या तसेच शिवस्मारकाच्या उद्‌घाटनाचा समारंभ सुरू झाला तेव्हा लगेचच व्यासपीठासमोर असलेल्या अति महत्त्वाच्या व्यक्‍तींसाठी राखीव असलेल्या दीर्घेत शिवसेना कार्यकर्त्यांनी "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,' अशा गगनभेदी घोषणा सुरू केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून "मोदी, मोदी'चा गजर सुरू झाला. उपस्थित नागरिकांमध्ये दोन गट पडू नयेत यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले. ध्वनिक्षेपक हाती घेत त्यांनी, "छत्रपतींचे जे मावळे असतील त्यांनी शांत बसावे,' असे आवाहन करत "जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. प्रत्यक्ष नेत्याने सूत्रे हाती घेतल्याने भाजप कार्यकर्ते शांत झाले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र शांतपणे बसून होते. घोषणा देणारे हे वेगवेगळे गट परस्परांच्या समोर उभे राहून बाचाबाचीच्या अवस्थेपर्यंत पोचतील असे चित्र दिसू लागल्याने अखेर जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्या स्टॅंडमध्ये प्रवेश केला. दोन्ही बाजूंना शांत करण्याचे आवाहन ते करत होते. अर्थात, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अखेरपर्यंत मधूनमधून "वाघ आला...'च्या घोषणा सुरूच ठेवल्या होत्या.

फडणवीसांनी घेतले सांभाळून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल आज जोरात झाले अन्‌ गाजले ते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण. आज दिवसभर ते यजमानाच्या भूमिकेत वावरत तर होतेच, शिवाय सरकारमधील सहकारी पक्षाला शिवसेनेला बरोबरीची वागणूक देणे हे त्यांचे प्रमुख धोरण होते. अरबी समुद्रात हॉवरक्रॉफ्ट गेले तेव्हा मुख्यमंत्री सतत ठाकरेंसमवेत वावरत होते.

वेदमंत्रांच्या गजरात मोदी पूजाविधीत व्यग्र असताना फडणवीस जातीने उद्धव यांच्याशेजारी उभे होते. कलशातून जल तसेच पवित्र माती स्मारकाच्या नियोजित स्थळावर उधळण्यात आली तेव्हाही फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लगत उभे न राहता उद्धव यांच्या हाताला हात लावून जल शिंपडत होते. बांद्रा-कुर्ला संकुलातील सभास्थानी उद्धव ठाकरे यांना समवेत घेऊन सभेला अभिवादन करण्यापासून तर एकीकडे पंतप्रधान मोदी आणि दुसरीकडे उद्धव अशा दोघांच्या मध्ये ते बसले होते.

गडकरींकडून शिवसेनाप्रमुखांचे स्मरण
शिवसेना आणि भाजप या दोन सहकारी पक्षांमधील अस्वस्थता कार्यक्रमस्थळी स्पष्ट दिसत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मात्र शिवस्मारकाचे भव्य स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून साकारले असल्याचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्रात उभे राहावयाचे हे स्मारक गेली कित्येक वर्षे परवानगीची प्रतीक्षा करत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व परवानग्या केवळ सहा महिन्यांच्या आत मिळवून आणल्या असे सांगत गडकरींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मुक्‍तकंठाने प्रशंसा केली.

कॉंग्रेसचे आंदोलन
सहारा समूहाकडून लाच स्वीकारल्याच्या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेले नाही. अशा भ्रष्ट पंतप्रधानांना मुंबईत भाषण देऊ देणार नाही, असा दावा करत कॉंग्रेसने आंदोलन केले. मुंबई विभागीय कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वात काही युवक बांद्रा-कुर्ला परिसरात धरणे आंदोलन करणार होते. मात्र, पोलिसांनी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून त्यांना अटक केली. वर्सोवा स्थानकात त्यांना रोखून ठेवण्यात आले होते. कॉंग्रेसने पुण्यापाठोपाठ मुंबईतही विरोध नोंदवलाच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bandra-Kurla Complex alliance Government War