आधार, पॅन कार्डच्या मदतीने बॅंक खात्यावर डल्ला?

अनिश पाटील
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - बॅंक खातेदाराने एटीएम कार्डची माहिती दिलेली नसतानाही भामट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार बोरिवली रेल्वे पोलिसांकडे दाखल झाली आहे. आधार व पॅन कार्ड आणि ओटीपी क्रमांकाच्या मदतीने भामट्यांनी आपल्या बॅंक खात्यातून 56 हजारांची रक्कम लंपास केल्याची तक्रार 25 वर्षांच्या तरुणीने केली आहे.

मुंबई - बॅंक खातेदाराने एटीएम कार्डची माहिती दिलेली नसतानाही भामट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार बोरिवली रेल्वे पोलिसांकडे दाखल झाली आहे. आधार व पॅन कार्ड आणि ओटीपी क्रमांकाच्या मदतीने भामट्यांनी आपल्या बॅंक खात्यातून 56 हजारांची रक्कम लंपास केल्याची तक्रार 25 वर्षांच्या तरुणीने केली आहे.

ही तरुणी 20 डिसेंबरला लोकलमधून प्रवास करत होती. त्या वेळी कांदिवली व बोरिवली स्थानकांदरम्यान तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. आपण बॅंक अधिकारी असल्याचे सांगून त्याने तिचा आधार व पॅन कार्ड क्रमांक सांगितला. बॅंकेची यंत्रणा अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी बॅंकेकडून मोबाईलवर ओटीपी क्रमांक पाठवला जाईल; त्याची माहिती द्या, अशी सूचना त्याने केली.
त्याने एटीएम कार्ड अथवा पासवर्ड मागितला नसल्यामुळे तिने निशंकपणे ओटीपी क्रमांक त्या तोतया बॅंक अधिकाऱ्याला दिला. त्यानंतर बॅंक खात्यातून 56 हजार रुपये काढण्यात आल्याचे तिला समजले. त्यानंतर तिने बोरिवली रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली.

मोबाईलवरून कॉल करणाऱ्या व्यक्तीला आपल्या बॅंक खात्याबाबत माहिती होती. त्याला आपले आधार व पॅन कार्ड क्रमांकही माहीत होते, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. त्या तोतया बॅंक अधिकाऱ्याला एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्ड दिला नव्हता, असेही तिने स्पष्ट केले आहे.

आधार कार्डद्वारे पैसे काढणे शक्‍य
एईपीएस (आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम) सुविधा सुरू असल्यास केवळ आधार कार्डच्या मदतीनेही बॅंक खात्यातून पैसे काढता येतात. त्यासाठी केवळ ओटीपी क्रमांकाची आवश्‍यकता असते. सध्या तपास प्राथमिक पातळीवर असल्यामुळे नेमक्‍या याच यंत्रणेचा वापर करून तरुणीच्या खात्यातून पैसे काढण्यात आले का, हे सांगणे शक्‍य नाही, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्या भामट्याने कदाचित तिच्या एटीएम कार्डची गोपनीय माहितीही मिळवली असेल. त्यासाठी आम्ही संबंधित बॅंकेकडे तिच्या खात्यावर झालेल्या व्यवहारांबाबत माहिती मागवली आहे, अशी माहिती त्याने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Account Aadhar Card Pancard