
संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजूनही पुस्तकात नाही
मुंबई - ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा खुशाल कोंबडं झाकून धरा...’ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जीव ओतणारा हा गोंधळ शाहीर आत्माराम पाटील यांनी लिहिला होता. तो जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभांमध्ये सादर केला जायचा, तेव्हा टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, द. ना. गव्हाणकर, आत्माराम पाटील यांच्यासारख्या कित्येक शाहिरांनी अमूल्य योगदान दिले; मात्र या शाहिरांचे योगदान नव्या पिढीला माहिती नाही. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येऊन ६२ वर्षे लोटून गेली, पण अजूनही राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात या लढ्यावर एक धडाही समाविष्ट केला नाही, अशी खंत दिवंगत शाहीर आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणी पाटील यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.
सध्या काही जण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा करत आहेत. मला त्यांना विनंती करायची आहे, की पहिले मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली याचा इतिहास तरी वाचा. त्यानंतर तोडण्याची भाषा करा, असेही इंद्रायणी पाटील यांनी सुनावले. शिक्षकांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे; मात्र पुस्तकात धडाच नाही ते तरी काय करणार, असा सवालही त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यावर आत्माराम पाटील यांना मुंबईतच मराठीजणांच्या होणाऱ्या गळचेपीबद्दल खूप त्रास व्हायचा; मात्र ते कुणाला काही न बोलता फक्त पोवाडा-कवितेतून व्यक्त होत असत, असेही इंद्रायणी पाटील यांनी सांगितले.
व्यवसायाकडे दुर्लक्ष!
आत्माराम पाटील यांचा भाजीचा व्यवसाय चांगला चालला होता. मात्र त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी संसाराकडे आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष केले. या काळात डोक्यावर साडेचार लाख रुपयाचे कर्ज झाले; मात्र त्याची खंत त्यांना कधीच नव्हती. आमच्या दुकानातील नोकर मला म्हणायचे, तुम्ही कृपया सांगा दादांना, आता बस करा. मात्र मी काय सांगणार? संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यावर त्यांना आनंद झाला. स्वप्न पूर्ण झाले... अशा कित्येक आठवणी इंद्रायणी पाटील यांनी सांगितल्या.
Web Title: Battle Of Sanyukt Maharashtra Still Not In Book
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..