बविआला आत्मचिंतनाची गरज

बविआला आत्मचिंतनाची गरज

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. ११ : पालघरमधील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या बविआला बालेकिल्ल्यासह सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या पिछेहाटीला सामोरे जावे लागले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे डहाणू, विक्रमगड आणि पालघर या तीन विधानसभा मतदारसंघात बविआला केवळ ६० हजार मते मिळाली. या आधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने लढणाऱ्या बविआला या वेळी मात्र वसई, विरारबाहेरील राजकीय अस्तित्वाची जाणीव झाली असावी. याबाबत आता पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन करायला हवे. कारण पालघर लोकसभेमध्ये सलग चौथ्यांदा हरण्याचा विक्रम केला आहे.
लोकसभेच्या निवडणुका लागल्यावर तीन विधानसभा मतदारसंघावर बविआ अवलंबून असल्याचे चित्र आजपर्यंतचे होते. बविआला प्रत्येक वेळी दोन्ही काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पाठिंबा देत आला होता. या वेळी मात्र जुन्या मित्रांनी त्यांची साथ सोडल्याचे निकालावरून दिसून येते. हक्काच्या बालेकिल्ल्यात अर्थात वसई, नालासोपारा व बोईसरमध्ये बविआचे राजेश पाटील यांना मताधिक्य मिळाले नाही. सलग चार वेळा बविआला पालघरमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहेत. त्यामुळे यापुढे पालघर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी वसई, नालासोपारा सोडून इतर तीन मतदारसंघात पक्ष बांधणीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेलाही वसई तालुक्यात आता फक्त चार जागा राहिल्या आहेत. त्यापैकी या घडीला बविआकडे दोन जागा, तर दोन जागा विरोधकांकडे आहेत. या सर्वांचा विचार करता येणाऱ्या विधानसभा मतदानाच्यावेळी पालघरमध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार बविआला धोबीपछाड देत मुसंडी मारू शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. अर्थात, विधानसभेला चित्र हे लोकसभेपेक्षा खूपच वेगळे असेल. त्यामुळे बविआ येथे कमबॅकसुद्धा करू शकते, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. मात्र, सहाही विधानसभा मतदारसंघात मोठी पिछेहाट झाल्याने बविआसमोर ते मोठे संकट असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यावर वर्चस्व राखायचे असेल, तर हितेंद्र ठाकूर यांनी आता जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्याचबरोबर येणारी विधानसभा आणि महापालिका निवडणूक लक्षात घेऊन वसई-विरारमध्ये तयार झालेले संस्थानिक मोडीत काढायला हवेत, तरच पुन्हा एकदा चांगले यश मिळू शकेल.


काय सांगते आकडेवारी
वसई विधानसभा मतदारसंघ
हेमंत सवरा (भाजप) ७६ हजार ३०७
भारती कामडी (ठाकरे गट) ६६८८८
राजेश पाटील (बविआ) ५०८६८
आमदार हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात सवरा यांनी पाटील यांच्यापेक्षा २५ हजार ४३९ इतकी जास्त मते घेतली आहेत. येथे विधानसभेला बविआला फटका बसण्याची शक्यता राजकीय चाणक्य वर्तवत आहेत.

नालासोपारा विधानसभा
हेमंत सवरा एक लाख ३६ हजार ८१८
भारती कामडी ६६ हजार १५०
राजेश पाटील ७९ हजार ४६०
- विधानसभेला येथेही बविआसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.

बोईसर विधानसभा मतदारसंघ
राजेश पाटील ६५ हजार २९१
भारती कामडी ६२ हजार ७०६
हेमंत सवरा एक लाख चार हजार ४३९
- बोईसरमध्ये भाजपचा बोलबाला दिसला. भारती कामडी यांनी राजेश पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केल्याने बोईसरमध्येही बविआला अपेक्षित यश मिळालेले नाही.

पालघर विधानसभा
राजेश पाटील २३ हजार ५३०
भारती कामडी ६४ हजार ३५२
हेमंत सवरा ९३ हजार ५९१

विक्रमगड मतदारसंघ
राजेश पाटील २२ हजार ७० मते
भारती कामडी ७२ हजार ८४४
हेमंत सवरा एक लाख सहा हजार ५३

डहाणू मतदारसंघ
राजेश पाटील १२ हजार ७९२
भारती कामडी ८३ हजार ८८२
हेमंत सवरा यांना ८३ हजार
- डहाणूत केवळ ८८३ मतांची आघाडी महाविकास आघाडीला मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com