काय सांगता! भीमसेन कापूर व लिस्ट्रिन माऊथवॉश कोरोनावर गुणकारी? काय आहे सत्य, वाचा

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

कार्यालय, घर निर्जंतुकीकरणासाठी भिमसेन कापूरचा वापर आणि दिवसातून दोन ते तीन वेळा लिस्ट्रिन माऊथवॉश केल्याने ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील पोलिस दलातील एकही व्यक्ती कोरोनाबाधित झालेली नाही.

ठाणे: कार्यालय, घर निर्जंतुकीकरणासाठी भिमसेन कापूरचा वापर आणि दिवसातून दोन ते तीन वेळा लिस्ट्रिन माऊथवॉश केल्याने ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील पोलिस दलातील एकही व्यक्ती कोरोनाबाधित झालेली नाही. यामुळे पुणे ग्रामीण मुख्यालयातंर्गत येणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा उपाय करावा जेणेकरुन कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल..अशा आशयाचे पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांचे पत्र सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यामुळे भिमसेन कापूर निर्जंतुकीकरणासाठी खरेच उपयुक्त आहे का? माऊथवॉशचा वापर जास्त करावा का याविषयीच्या चर्चांना शहरात उधाण आले आहे. 

मुंबई ठाणे परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

समाज माध्यमावर गेले दहा बारा दिवस पुणे ग्रामीण पोलिसांना सुचना केलेले एक पत्र व्हायरल होत आहे. यापत्रामध्ये अपर पोलिस अधीक्षक पुणे व बारामती यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना एक संदेश दिला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे कार्यरत असलेल्या पोलिसांनी भिमसेन कापूर घरामध्ये व कार्यालयामध्ये लावले असता ते घर व कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यास उपयुक्त ठरले. यामुळे पोलिस ठाणे - शाखेस नेमणूकीस असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी हे लिस्ट्रिन माऊथवॉशचा वापर करतील, व भिमसेन कापूर सर्व कार्यालय, घरामध्ये लावून निर्जंतुकीकरण करावे जेणेकरुन कोरोनापासून बचाव होण्यास मदत होईल असा संदेश देण्यात आला आहे. यापत्राखाली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक नारायण पवार यांचे नाव आहे. हे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी भिमसेन कापूर विषयी गुगलवर सर्च करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. 

 

कल्याण पोलीसांनी असा कोणताही प्रयोग केलेला नाही. एप्रिल महिन्यात पोलिस कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 व इतर काही अत्यावश्यक वस्तू, औषध यांचे वाटप करण्यात आले होते. खबरदारी घेतली जात असल्याने कल्याण येथे सुरुवातीला पोलीसांना लागण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. परंतू आता काही पोलीसांना लागण झाली आहे. या पत्रव्यवहाराविषयी आम्हाला तरी सध्या काहीच माहिती नाही. 
विवेक पानसरे, उपायुक्त कल्याण परिमंडळ 3


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beneficial on Bhimsen Kapoor and Listrin Mouthwash Corona?