

Mumbai Local Train: मुंबईतील स्थानिक प्रवास अधिक सोपा आणि पर्यटकांसाठी आकर्षक बनवण्यासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या पर्यटन तिकीट योजनेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल ३४ हजार ९२६ प्रवाशांनी पर्यटन तिकिटे काढून या सुविधेचा लाभ घेतला. या माध्यमातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत १० लाख ८६ हजार ३१० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
मुंबई लोकल ही वाहतुकीसाठी जलद, स्वस्त आणि कार्यक्षम सुविधा मानली जाते; मात्र तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याच्या त्रासाला पर्याय म्हणून मध्य रेल्वेने ही पर्यटन तिकीट योजना सुरू केली आहे. या तिकिटांद्वारे पर्यटकांना विनाअडथळा लोकल प्रवासाचा आनंद घेता येतो. केवळ एका तिकिटावर प्रवाशांना मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील कोणत्याही स्थानकावरून कोणत्याही स्थानकापर्यंत प्रवास करता येतो.