esakal | बेस्ट चालक आता भाड्याने देणार; कामगार संघटनांचा मात्र निर्णयाला विरोध | BEST
sakal

बोलून बातमी शोधा

BEST WORKER

बेस्ट चालक आता भाड्याने देणार; कामगार संघटनांचा मात्र निर्णयाला विरोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्टच्या (BEST) ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसगाड्या (bus on rent) आल्याने बेस्टच्या चालकांचे (best driver) काम कमी झाले आहे. त्यामुळे बेस्टच्या चालकांना आता सरकारी आणि खासगी कंपन्यांची वाहने (company vehicles) चालवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे; मात्र बेस्ट प्रशासनाच्या (BEST authorities) या निर्णयाला कामगार संघटनांनी (workers union) विरोध केला आहे.

हेही वाचा: महिलांसाठी बेस्टची विशेष सेवा; अर्थसंकल्पात तरतूद

बेस्टच्या ताफ्यात सध्या एक हजार ४२६ भाडेतत्त्वावरील बसगाड्या आहेत. त्यासाठी कंत्राटदारांमार्फतच चालक पुरवले जातात. बेस्टकडे कायमस्वरूपी नऊ हजाराच्या आसपास चालक असून त्यातील एक हजार २०० चालकांना रोज कोणतीही नियुक्ती मिळत नसल्याने त्यांना इतर कामांमध्ये जुंपले जाते. त्यात बसचे मार्ग बदलल्यास माहिती देण्यासाठी रस्त्यावर उभे राहणे, डेपोत बसगाड्यांचे नियोजन करणे आदी कामे दिली जातात.

बस चालवण्याचे काम दिले जात नसले, तरी त्यांना वेतन नियमित दिले जात असल्याचा दावा प्रशासनाने केला. चालकांना बस चालवण्याचा सराव राहावा म्हणून त्यांना खासगी आणि सरकारी आस्थापनांची वाहने चालवण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासन आठ तासांच्या कामासाठी कंपन्यांकडून ९०० रुपयांचे शुल्क आकारणार आहे. या निर्णयामुळे चालकांचाही सरावही राहील; तसेच बेस्टला उत्पन्नही मिळेल, असा हेतू असल्याचे सांगण्यात आले.

बेस्ट प्रशासनाने भाडेतत्त्वावर बसगाड्या घेताना सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते; मात्र आता चालकांना काम नसल्याने त्यांना वेठबिगारीला जुंपले जाणार असल्याचा आरोप केला जात आहे.

आंदोलनाचा इशारा

बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाविरोधात कामगारांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मंगळवारी (ता. १२) परिवहन विभागाच्या प्रत्येक बस डेपोत निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शंशाक राव यांनी स्पष्ट केले आहे. बेस्टच्या या निर्णयाला बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितीन पाटील यांनीही विरोध केला आहे.

loading image
go to top