सावधान ! 'फटका गॅंग' पुन्हा सक्रिय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

ठाणे व कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यांतर्गत एकाच दिवशी दोन घटना 

मुंबई महानगरीत कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाश्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तुलनेने लोकलची संख्या वाढवूनही गर्दीचा महापूर कमी होत नाही. त्यामुळे लोकलमध्ये नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. अनेकजण लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करीत असल्याने रेल्वे मार्गात दबा धरून बसलेल्या भुरट्याकडून प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे मोबाइल लुटणारी फटका गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. ठाणे व कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात 28 जानेवारी (काल) रोजी दोन घटनांची नोंद झाली आहे. 

मोठी बातमी - 'मुख्यमंत्री असो वा आमदार, चौकशीसाठी बोलवलं जाईल'; वायरलेस रेकॉर्ड्सही तपासण्याची परवानगी

मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणाऱ्या उपनगरी (लोकल) गाड्यांमधून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करीत असतात.सार्वजनिक सुट्टीचा दिवस आणि विशेषतः दुपारच्या कालावधीचा अपवाद सोडल्यास लोकल गाड्या नेहमीच तुडुंब भरून वाहत असतात.त्यामुळे लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यावर या फटका गॅंगचे विशेष लक्ष असते.रुळांलगतच्या खांबावर चढून किंवा रुळांशेजारी लपून बसून लोकल गाड्यांच्या दारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल लंपास करण्यामध्ये ही भुरटी फटका गॅंग सक्रिय असते.

मोठी बातमी - जिओ ग्राहकांनो, थायलंडला जाण्यासाठी बॅगा भरा!

जानेवारीमध्ये मडगाव-मुंबई या मांडवी एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यातून मुंबईत येत असलेल्या श्रवण इंदुलकर रा. जोगेश्वरी (प) येथील तरुणाच्या हातावर दिवा स्थानक सोडल्यानंतर कुणीतरी फटका मारला,आणि त्याचा 14 हजारांचा मोबाईल फोन पळवला. तर, 27 जानेवारी रोजी गोरखपूर एक्‍स्प्रेसने निघालेला तरबेज आलम (26) रा.मालाड (प.) या तरुणाबाबतही असाच प्रकार घडला. कुर्ला सोडल्यानंतर एक्‍स्प्रेस गाडीचा वेग विद्याविहार स्थानकादरम्यान धीमा झाल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातावर फटका मारून त्यांचा 16 हजारांचा मोबाईल पळवला.

मोठी बातमी - चीनची आणखी एक वाहन कंपनी भारतात धुमाकूळ घालणार 

या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने दोघेही प्रवाशी बचावले असले तरी, फटका गॅंगची धास्ती मात्र दोघांनी घेतली आहे. याप्रकरणी, ठाणे व कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात 28 जानेवारी रोजी गुन्हे नोंद केले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसात ठाणे खाडीपुलावर ठाण मांडून एकाचवेळी तीन प्रवासांच्या मोबाइलची चोरी केल्याचे समोर आले आहे. 21 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या तरुणाच्या हातावर विटावा दरम्यान खांबावर दबा धरून बसलेल्या व्यक्तीने हातावर फटका मारून मोबाइल लांबवला. काही वेळाच्या अंतराने अशाच दोन घटना घडल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. 

मोठी बातमी - मोदीजी, मी चालू तरी शकतो का? का त्यावरही बंदी घातली? - कुणाल कामरा

फटका गॅंगची मोडस ऑपरेंडी 

रेल्वे रुळावर अथवा विद्युत खांबावर दबा धरून बसलेल्या टोळक्‍याकडून लोकलमधून प्रवास करताना दरवाजाजवळ उभे असलेले मोबाईलवर बोलणारे प्रवासी हेरले जातात. लोकलचा वेग मंदावला कि, चोरटयांकडून दंडुका किंवा लोखंडी वस्तूने प्रवाशाच्या हातावर जोरदार फटका मारला जातो. त्यामुळे प्रवाशाच्या हातून मोबाइल पडताच चोरटे मोबाईल घेऊन धूम ठोकतात. अनेकदा अचानक लागलेल्या फटक्‍यामुळे बेसावध प्रवाशाचा तोल जाऊन धावत्या गाडीतून खाली पडून ते जखमी होण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. मध्यंतरी ठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान अशा फटका गॅंगची मोठी दहशत होती. आता सर्रास असे प्रकार ठिकाण बदलून होतच असल्याने प्रवाश्‍यांनी स्वतःच दक्षता घेणे गरजेचे आहे. 

beware of fataka gang in mumbai once again it is active two incidents registered in thane and kurla


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beware of fataka gang in mumbai once again it is active two incidents registered in thane and kurla