
Mumbai Crime: गीझरमुळे नाही तर भांग प्यायल्यामुळे जोडप्याचा मृत्यू! घाटकोपरच्या त्या घटनेला नवे वळण
घाटकोपरमधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या दाम्पत्याच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा तपास पंतनगर पोलीस करत आहेत. मित्रांसोबत रंग खेळून आलेले टीना शाह आणि दीपक शाह राहत्या घरातील बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळले होते.
धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता शाह दाम्पत्य घरापासून दोनशे मीटर अंतरावर छेडानगर जंक्शनवर दिसलं होतं. मात्र त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांच्या ठावठिकाण्याविषयी स्पष्टता नाही. पोलिसांनी पाच पथकं तयार करुन दरम्यानच्या सहा तासांच्या कालावधीत शाह दाम्पत्य नेमकं कुठे गेलं होतं, हे शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.
त्यानंतर काल (शुक्रवारी) पोलीस आणि डॉक्टरांनी हे भांग, अल्कोहोलसारख्या विषबाधाचे कारण असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे. या जोडप्याचे महत्त्वाचे अवयव तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. पोटातील रासायनिक पदार्थ, घटनास्थळी सापडलेल्या उलटीच्या खुणा आणि इमारतीच्या कॅमेऱ्यातील फुटेज याचा तपास सुरू आहे. यामधून काही माहिती मिळण्याची शक्यता आहे.
दीपक शहा (44) आणि टीना शहा (38) हे जोडपे बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले, त्यांच्याभोवती उलट्या आणि गिझरचे पाणी गळत होते. विलेपार्ले येथे मित्रांसोबत दुपारी ३.३० पर्यंत रंगपंचमी साजरी करून दोघे मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास कुकरेजा टॉवर्स येथे घरी परतले.
पोलिसांनी सांगितले की, दोघे घरी पोहोचल्यानंतर लगेचच मरण पावले. एक दिवसानंतर त्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या शरीरावर शॉवरमधून पाण्याचा सतत प्रवाह सुरू होता. 20 तासांपर्यंत ते भिजत राहिल्यामुळे त्यांची त्वचा सैल झाली होती, जवळजवळ सोलून बाहेर पडली होती.
घटस्फोटानंतर दीपकचे हे दुसरे लग्न होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याला दोन मुले आहेत. माजी पत्नीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच ज्यांनी या जोडप्याला फोन केला होता त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. गेल्या तीन महिन्यांत दोघांना आलेल्या 4,500 कॉल्सवरून पोलिस नावांची यादी करत आहेत.
बुधवारी दुपारच्या सुमारास, मोलकरीण त्यांच्या घरी गेली, परंतु दारावरची बेल किंवा फोन कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या एका नातेवाईकाने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला.सुरुवातीला पोलिसांनी गिझरमधून गॅस गळतीमुळे हा मृत्यू झाला असावा असे सांगितले होते, परंतु गिझर बंद असल्याचे निष्पन्न झाले, याबाबतची माहिती पंत नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली आहे.
"बाथरुमचा शॉवर बंद केला होता, गिझर चालू नव्हता. आमच्या आधी जे डॉक्टर आले होते, त्यांना दीपक आणि टीना यांची नाडी बंद पडल्याचं आढळलं. आम्ही दोघांना राजावाडी रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं," असे पंतनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत म्हणाले.
"गुरुवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दोघांचे मृत्यूचे कोणतेही प्राथमिक कारण दिलेले नाही. कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेद्वारे पुढील विश्लेषणासाठी व्हिसेरा आणि आवश्यक पेशींचे जतन करण्यात आले आहे" असे पोलिसांनी सांगितले.