मुंबई - पुष्परथामध्ये विराजमान संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांची प्रदक्षिणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारकरी टोपी व उपरणे घालून उपस्थिती, वेगवेगळी भजनी मंडळे व गायकांनी आळवलेले संतांचे अभंग, बालवारकऱ्यांचे पखवाज व टाळांच्या ठेक्यात हरिनामस्मरण, दर्शनबारीतून शांततेने पुढे सरकत पादुकांसमोर मनोभावे नतमस्तक होणारे भाविक, असे संत ज्ञानोबा माउलींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ‘संतांच्या संगती मनोमार्गगती’ दर्शविणारे भक्तिमय वातावरण शनिवारी (ता. ८) पहायला मिळाले. निमित्त होते... ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे वरळी येथील ‘एनएससीआय डोम’मध्ये आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याचे अन् भक्ती-शक्ती व्यासपीठाच्या समारंभाचे...
वरळीतील ‘एनएससीआय डोम’मधील वातावरण शुक्रवारी दुपारपासूनच भक्तिमय झाले होते. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून संत आणि श्रीगुरूंच्या पादुका दाखल झाल्या होत्या. शनिवारी सकाळी सर्व पादुकांचा अभिषेक आणि पूजा केली. फुलांनी सजवलेल्या रथातून एनएससीआय परिसरातून प्रदक्षिणा सोहळा झाला.
यामध्ये संत ज्ञानेश्वर माउली (नेवासा), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत नामदेव महाराज (घुमान), संत जनाबाई (गंगाखेड), संत नरहरी सोनार (पंढरपूर), संत सेना महाराज (पंढरपूर), संत सावता माळी महाराज (अरण), संत एकनाथ महाराज (पैठण), संत तुकाराम महाराज (भंडारा डोंगर), संत निळोबाराय (पिंपळनेर) यांच्यासह श्री महेश्वरनाथ बाबाजी, श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट), श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज (शेगाव), समर्थ रामदास स्वामी (सज्जनगड), टेंब्ये स्वामी महाराज (माणगाव), श्री गोंदवलेकर महाराज (गोंदवले), शंकर महाराज (धनकवडी-पुणे), गुळवणी महाराज (पुणे), गजानन महाराज (शिवपुरी) आणि श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे (कार्ला) या श्रीगुरूंच्या पादुकांचा समावेश होता. भक्ती-शक्ती व्यासपीठ परिसरात सर्व पादुकांसाठी मंदिरांची उभारणी केली होती. त्यात पादुका विराजमान झाल्यानंतर उत्सवाचा उद्घाटन सोहळा सुरू झाला.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै प्रमुख उपस्थित होते. ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबल’चे अध्यक्ष अभिजित पवार यांनी श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
उद्घाटन सोहळ्यानंतर वेगवेगळ्या भजनी मंडळांनी आणि कलाकारांनी भजनसेवा केली. आळंदी येथील श्री कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा केला. पादुका प्रदक्षिणा सोहळ्यातही ते सहभागी झाले होते. ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’ गजर करीत बाल वारकरी भजनात तल्लीन झाले होते. त्यांच्यासमवेत पाउली व फुगड्या खेळत भाविकांनीही ठेका धरला होता.
दिवसभर दर्शनबारीतून येऊन भाविकांनी संत व श्रीगुरूंच्या पादुका दर्शनाचा लाभ घेतला. सर्वांना लाडवाचा प्रसाद देण्यात आला. सर्व जण एकमेकांना ‘माउली’ म्हणूनच संबोधत होते. वेगवेगळ्या दालनांना भेटी देऊन अनेकांनी आयुर्वेदिक औषधी, वनस्पतींची माहिती घेतली.
संत व सद्गुरू विचारांची पुस्तके खरेदी केली. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ या संत तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे अनेकांनी आपल्या मनोकामनापूर्तीसाठीचे मागणेही मागितले आणि प्रसन्न मनाने प्रसाद घेऊन घराकडे परतले.
‘ॐ’नामाचा जप
श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव सोहळ्याच्या उद्घाटनानंतर ‘ॐ’ नामाचा अखंड जप सुरू होता. ‘ॐ’कार स्वर ऐकत आणि पादुका मंदिरासमोरील घंटानाद करत भाविक दर्शन घेत होते. प्रत्येक संताचा नामजपही ते करत होते.
‘हरिपाठा’ची गोडी
सायंकाळी पाच वाजता आळंदी येथील श्री कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या साधकांनी संत ज्ञानेश्वर माउली यांचा हरिपाठ सुरू केला. त्यातील ओवीतील प्रत्येक चरणांसंगे पाउलीचा खेळही रंगला. ‘हरी मुखे म्हणा। हरी मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।’ म्हणत सर्व भाविकांना त्यांनी नामस्मरणात तल्लीन केले.
‘एकमेका लागतील पायी रे...।’
भक्ती शक्ती व्यासपीठासमोर माउलींचा हरिपाठ सुरू असताना आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे आगमन झाले आणि वारकरी विद्यार्थ्यांसमवेत ठेका धरत पाउली खेळले. सर्व विद्यार्थ्यांसमोर नम्रपणे झुकत नमस्कार केला. यामुळे वारकरी संप्रदायाचा पाया असलेला ‘एकमेका लागतील पायी रे...।’ची अनुभूती आली. हरिपाठ अभंगात भाविकही तल्लीन झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.