esakal | मुंबई डबेवाल्यांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई डबेवाल्यांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मुंबईतील डबेवाल्यांनी ही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

मुंबई डबेवाल्यांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मुंबईतील डबेवाल्यांनी ही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक आणले असून त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याची भीती ही डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे. 

डबेवाल्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की , केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी, आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले आहेत. सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठी हल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता मोदी सरकारने ही विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करीत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. कोरडवाहू आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह असल्याचे ही डबेवल्यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाची बातमी- मुंबई लोकलनं प्रवास करत रोहित पवारांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचा हा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्व सुद्धा हे सरकार पार पाडत नाही हे संतापजनक आहे. सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. करोना आणी लॅाक डाऊनमुळे देशांतील कामगार आधीच देशोधडीला लागला आहे यातून डबेवाला कामगार ही सुटलेला नाही. किमान देशातील शेतकरी तरी देशोधडीला लागू नये असे डबेवाला कामगाराला वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bharat Band Updates Mumbai Dabewalas support farmers movement

loading image