भावे नाट्यगृह नववर्षात सुरू होणार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

मागील १० महिन्यांपासून वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ते बंद ठेवण्यात आले होते; मात्र आता या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या नाट्यगृहाचा पडदा उघडण्यात येणार आहे.

नवी मुंबई : मागील १० महिन्यांपासून वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ते बंद ठेवण्यात आले होते; मात्र आता या नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या नाट्यगृहाचा पडदा उघडण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, पनवेल व मुंबईकडे नाटक पाहण्यासाठी जाणाऱ्या नाट्यरसिकांची गैरसोय दूर होणार आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वाशी सेक्‍टर १६ ए येथे विष्णुदास भावे हे एकमेव नाट्यगृह आहे; मात्र या नाट्यगृहाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे पालिकेने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ११ मार्च २०१९ पासून ते बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नवी मुंबईतील नाट्यरसिकांना मुंबई, ठाणे, पनवेल येथे जावे लागत असल्याने गैरसोय होत होती; लवकर दुरुस्तीचे काम संपवून नाट्यगृह पुन्हा सुरू करावे, अशी मागणी नाट्यरिसकांकडून करण्यात येत होती. नवी मुंबई महापालिकेकडून ११.५० कोटी रुपये खर्चून या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. नोव्हेंबरपर्यंत या कामाची मुदत देण्यात आली होती. मात्र, आणखी काही कामाची आवश्‍यकता असल्याने दिलेल्या मुदतीत काम झाले नाही. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. ते अंतिम टप्प्यात असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीपासून, हे नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.

नाट्यगृह सुरू होणार असून, नव्या रूपात ते पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांची होणारी फरपटदेखील थांबणार असल्यामुळे आनंद होत आहे. ऐरोली येथील नाट्यगृहाचेदेखील काम लवकरात लवकर सुरू व्हावे. त्यामुळे नवी मुंबईतील  नाट्यरसिकांना उपनगरांसह मुंबईकडे जावे लागणार नाही.
- अशोक पालवे, नाट्यकर्मी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhave theater will begin in New Year!