भिवंडी इमारत दुर्घटना! मृतांचा आकडा 39 वर; मृतांच्या नातेवाईकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून 4 लाखाची मदत

शरद भसाळे
Wednesday, 23 September 2020

सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दूर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर पोहोचली आहे

मुंबई - सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दूर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर पोहोचली आहे.तर २५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. जवळपास ४० वर्ष जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावण्यात आली होती. 

या दुर्घटना प्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी पालिकेचे तत्कालीन प्रभाग समितीचे 3 चे सहाय्यक आयुक्त आणि प्रभाग इंजिनिअर अशा दोघांना सोमवारी संध्याकाळी तातडीने निलंबित केले आहे. सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. सदर अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आयुक्त डॉ.आशिया यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे दिले आहेत.

Mumbai Rain: आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, मुंबई पालिकेकडून नागरिकांना आवाहन

आपत्ती ग्रस्तांना सरकारची मदत

दूर्घटनास्थळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देत येथील बचाव कार्याची माहिती आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या कडून घेतली. इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना काल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत केली होती आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इमारत अनाधिकृत असल्या बाबतची पडताळणी करून राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे कडून अधिक 4 लक्ष रुपयांची मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी जाहीर केली.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhiwandi building accident Death toll at 39