पंकजा-भुजबळ भेटीने भाजपमध्ये खळबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

मुंबई - ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जे.जे. रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पंकजा यांच्यानंतर, मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसेदेखील भुजबळांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मुंबई - ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जे.जे. रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. पंकजा यांच्यानंतर, मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसेदेखील भुजबळांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ओबीसींच्या विषयांमध्ये छगन भुजबळ हे आमचे नेते असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी मान्य केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या संख्येने निघत आहेत. अशा वेळी ओबीसी राजकारणाचे समीकरण घट्ट करण्याचे हे संकेत असू शकतात, असे मानले जाते. दरम्यान, गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या राजकीय बांधणीची एकत्र केलेली चळवळ आणि मराठा आरक्षण या राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या बाबी मानल्या जातात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असताना पंकजा यांनी कारावासात असलेले भुजबळ यांची भेट घेणे यावरून भाजपमध्ये आश्‍चर्य व्यक्‍त होत आहेत. ज्या सरकारने भुजबळांना अटक करून कारावासात पाठवले त्याच सरकारमधील पहिल्या फळीतील मंत्री पंकजा यांनी त्यांची भेट घेणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीचे ठरणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.
छगन भुजबळ 17 सप्टेंबरपासून जे.जे रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज पंकजा व भुजबळ यांची सुमारे 40 मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मुंडे-भुजबळ कुटुंबीयांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे आज पंकजा यांनी भेट घेतल्याचे सांगितले जाते. या वेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली.

अंतर्गत गटबाजीचे संकेत
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेही भुजबळांना भेटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे व खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी गटातील असल्याचे मानले जाते. त्यामुळे मुंडेंनंतर खडसे यांनी भुजबळ यांची भेट घेतल्यास भाजपातील अंतर्गत गटबाजीला उधाण येण्याचे संकेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhujbal BJP-trip excitement pankaja