परप्रांतीयांमुळे भूमिपुत्रांचा मासेविक्री व्यवसाय मंदावला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

परप्रांतीयांचा हस्तक्षेप वाढल्याने नवी मुंबईतील भूमिपुत्रांचा मासेविक्रीचा व्यवसाय मंदावला आहे. मागील ५ ते १० वर्षांमध्ये परप्रांतीयांची संख्या वाढली असून, त्यांच्यावर पालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी ‘दिवाळे कोळीवाडा ग्रामस्थ युवा सामाजिक संस्थेकडून करण्यात आली.

नवी मुंबई : परप्रांतीयांचा हस्तक्षेप वाढल्याने नवी मुंबईतील भूमिपुत्रांचा मासेविक्रीचा व्यवसाय मंदावला आहे. मागील ५ ते १० वर्षांमध्ये परप्रांतीयांची संख्या वाढली असून, त्यांच्यावर पालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी ‘दिवाळे कोळीवाडा ग्रामस्थ युवा सामाजिक संस्थेकडून करण्यात आली.

परप्रांतीय नागरिक अनधिकृतरीत्या दारोदारी फिरून मासे विकत आहेत. त्यामुळे पालिकेने मासेविक्रीसाठी उभारलेल्या मासळी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. ग्राहक नसल्याने महिला मासेविक्रेत्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मागील महिन्यात आलेल्या चक्रीवादळाने मासेमारी संकटात आली आहे. त्यातच नाल्यातून सोडण्यात येणारे रसायनमिश्रित पाणी खाडीतील मासेमारीला हानिकारक ठरत असल्याने, पूर्वीसारखी मासळी मिळत नसल्याने मासेमारी करणाऱ्या भूमिपुत्रांवर संकट कोसळले आहे. याशिवाय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे दिवाळे खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने, मासळी नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच ४१० कलमाचे परप्रांतीय मासेविक्रेते उल्लंघन करत आहेत. या कलमानुसार मासळी बाजाराशिवाय इतर कुठेही मासेविक्री करू नये. मासे कापण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांचा वापर केवळ मासळी बाजारात केला जावा. मात्र या नियमांचे पालन परप्रांतीय मच्छीमार करताना दिसत नाहीत. त्यामुळे पालिकेकडून या मासेविक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिवाळे कोळीवाडा ग्रामस्थ युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भूषण कोळी यांनी केली.

दहा वर्षांपूर्वी परप्रांतीय मासेविक्रीमध्ये घुसखोरी करत असल्याचे जाणवल्याने स्थानिक महिलांनी त्यांना गावा-गावातून पिटाळून लावले होते; मात्र हेच परप्रांतीय आता मोक्‍याच्या ठिकाणी बसून, सर्रास मासेविक्री करत आहे. गावातील मच्छीमार महिला गावात परप्रांतीयांना मासे विक्रीसाठी मज्जाव करत असल्याने हे मच्छीमार कॉलनीत किंवा ज्या ठिकाणी स्थानिक मच्छीमार मासेविक्री करत नाहीत, अशा ठिकाणी जाऊन आपल्या व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे हे परप्रांतीय कमी दर्जाची मासळी विकत असून, स्वस्तात मासळी मिळत असल्याने ग्राहकांचा या परप्रांतीयांकडून मासळी खरेदी करण्याकडे कल असतो. तर पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने आणि पावसाळ्यानंतर व्यवसायात मंदी असल्याने अनेक भूमिपुत्र कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच या परप्रांतीय विक्रेत्यांमुळे स्थानिक मासेविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या परप्रांतीय मासेविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांकडून करण्यात येत आहे.

प्रत्येक गावातील स्थानिकांनी परप्रांतीयांना मासेविक्रीसाठी विरोध करावा. तसेच याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारदेखील केली जावी. जेणेकरून त्यांच्यात पालिकेच्या कारवाईची भीती निर्माण होईल. याबाबत पालिका आयुक्तांना भेटून लवकरच पत्र देण्यात येईल.
- भूषण कोळी, अध्यक्ष, दिवाळे कोळीवाडा ग्रामस्थ युवा सामाजिक संस्था.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhumiputra's fishing business slowed down due to other state persons