
७४ टक्के बिलांचा भरणा ऑनलाईन
मुंबई : वीज बिल कॅशलेस भरण्याच्या महावितरणच्या सुविधेला ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. वीज बिलांच्या तब्बल ७४ टक्के रकमेचा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाईन पर्याय निवडला आहे. वर्षभरात ५३ हजार ५० कोटी रुपये वीज बिलापोटी ग्राहकांनी ऑनलाईन भरले आहेत. उच्च दाब ग्राहकांनी ९८ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन भरली. ५८ टक्के लघुदाब ग्राहकांनी कॅशलेस सेवेचा वापर केला आहे.
ग्राहकांनी पसंती दिल्याने ऑनलाईनचे प्रमाण ५४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कोरोना काळात ऑनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ऑनलाईनसाठी ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत सवलतही मिळते. महावितरणने वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in संकेतस्थळ व महावितरण मोबाईल ॲप आणि उच्च दाब ग्राहकांसाठी स्वतंत्र आरटीजीएस सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीज बिल १० हजारांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध आहे.
त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीज बिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. त्यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा पर्याय आहे. वीज बिलावर असलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करून ग्राहकांना यूपीआयद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. येत्या काळात वीजबिलाची वसुली १०० टक्के ऑनलाईन करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न राहणार आहे, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यानची आकडेवारी
लघुदाब ग्राहकांनी ऑनलाईन भरलेली बिलाची रक्कम
१९ हजार ३४७ कोटी ५५ लाख
उच्चदाब ग्राहकांनी ऑनलाईन भरलेली बिलाची रक्कम
३४ हजार ६०२ कोटी ८८ लाख
Web Title: Bills Are Paid Online Msedcl Customers Prefer Cashless Facility
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..