Bird Flu Alert : नागरिकांनी मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये

भाग्यश्री भुवड
Friday, 15 January 2021

मुंबईसह राज्यात कुठेही बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने मृत पक्षी  आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, 15: मुंबईसह राज्यात कुठेही बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने मृत पक्षी  आढळून आल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करा असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे. राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत पक्षी निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी.

बर्ड फ्ल्यु रोगाबाबत दक्षता घेणे आवश्यक -

केदार म्हणाले, "नागरीकांनी मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावू नये.प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4(1) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे आणि त्यांनी ही माहिती नजिकच्या पशुवैद्यकाला लेखी स्वरूपात कळवणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा  उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरीता राज्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाची बातमी : धनंजय मुंडे प्रकरणात मोठी बातमी; टाकलं एक पाऊल मागे, रेणू शर्माने घेतली माघार!

अंडी आणि पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित -

अंडी आणि चिकन 70 अंश सेल्सियस तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होतात. अंडी आणि चिकन खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज आणि अफवा पसरवण्यात येऊ नये याची सर्व जनतेने नोंद घ्यावी, असेही केदार यांनी आवाहन केले आहे.

भोपाळ आणि पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणी -

  • महाराष्ट्र राज्यातील 14 जानेवारी 2021 रोजी, कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, लातूर 47, गोंदिया 25, चंद्रपूर 86, नागपूर 110, यवतमाळ 10, सातारा 50, रायगड जिल्ह्यात 3, अशी 331 मृत पक्षांची नोंद आहे.
  • सांगली जिल्ह्यात 34, अमरावती व सोलापूर जिल्ह्यात 1 बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षामध्ये व वर्धा येथे 8 मोर अशा एकूण 44 पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
  • नाशिक जिल्ह्यात यवतमाळ, नंदुरबार 6, पुणे 2 व जळगाव जिल्ह्यात 2 अशा प्रकारे एकूण राज्यात 7 कावळ्यांमध्ये मृत आढळून आली आहेत.
  • राज्यातील 14 जानेवारी 2021 रोजी एकूण 382 पक्षांमध्ये मृत झाली आहे. हे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत.
  • तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास 8 ते 72 तास लागू शकतात, 8 जानेवारी 2021 पासून आजतागायत एकूण 2378 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

बर्ड फ्लू पॉझीटीव्ह "संसर्गग्रस्त क्षेत्र" म्हणून घोषित -

पूर्वी पाठवलेल्या नमून्याचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे) आणि दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच मुरुंबा (जि. परभणी) या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅयोजैनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच5 एन1 या स्ट्रेन) करता आणि बीड येथील नमूने (एच5 एन 8 या स्ट्रेन) करीता पॉझिटीव्ह आलेले आहेत. लातूर येथील नमुनेही सकारात्मक झाल्यामुळे या क्षेत्रास "संसर्गग्रस्त क्षेत्र" म्हणून घोषित करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मृत पक्षांचा भाग,  "सतर्कता क्षेत्र"

बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये 10 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात परभणी, लातूर, ठाणे, नाशिक, व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच गोंदिया, नागपूर, नाशिक, यवतमाळ व सातारा येथील नमूने नकारार्थी आढळून आले आहेत. बर्ड फ्लू रोग प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2006 अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मृत झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

bird flu alert Citizens should not touch dead bodies or perform autopsies


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bird flu alert Citizens should not touch dead bodies or perform autopsies