'पालकमंत्र्यांचा तुघलकी निर्णय रद्द करा'; पोईसर नदीरुंदीकरणप्रश्नी भाजपचे आंदोलन 

कृष्ण जोशी
Friday, 4 December 2020

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेला तुघलकी निर्णय रद्द करावा, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर हल्ला चढविला. 

मुंबई ः पोईसर नदी रुंदीकरणबाधितांना चेंबूरला घरे द्यायची आणि चेंबूरजवळच्या माहूलवासियांना मालाड येथे घरे द्यायची हा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेला तुघलकी निर्णय रद्द करावा, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर हल्ला चढविला. 

हेही वाचा - यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरुन मुंबई पालिकेत भाजप- शिवसेना सदस्यांचा राडा

या तुघलकी निर्णयामुळे रहिवाशांचे होणारे हाल तसेच त्यांच्या पुनर्वसनाची निकड याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे कांदिवली येथे मोठे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री ठाकरे यांच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी परिसरातील नगरसेवक, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह शेकडो प्रकल्पबाधित उपस्थित होते.

पोईसरच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नजिकच्याच परिसरात व्हावे यासाठी भातखळकर यांनी पाठपुरावा केल्याने 2018 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा आदेश दिला होता. मात्र पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय बदलला व ती घरे माहूलवासियांना देण्याचे ठरवले. त्यामुळे पोईसरच्या प्रकल्पग्रस्तांना चेंबूरला पाठवायचे ठरविण्यात आले आहे. असा उलटसुलट कारभार सरकारने करू नये. त्याऐवजी पोईसरच्या लोकांचे जवळच्याच परिसरात पुनर्वसन करावे, अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली. हा अन्यायकारक निर्णय बदलला नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.  

हेही वाचा - विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, गृहमंत्र्यांची भाजपवर खोचक टीका

पोईसर नदी रुंद करताना पोईसर-हनुमान नगर परिसरात शेकडो घरे तोडली जात असून त्यांना चेंबूरला पाठविण्यात येणार आहे. या रहिवाशांच्या नोकऱ्या-कामे याच परिसरात आहेत, त्यांच्या मुलांच्या शाळाही जवळच आहेत. येथे स्थिरावलेल्या नागरिकांना अन्यत्र नेऊन विस्थापित करण्याचा तुघलकी कारभार हे सरकार करीत आहे अशी टीका यावेळी करण्यात आली.

bjp workers agitation over poisar river redevelopment issue in chembur

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp attack on aditya thackerey workers agitation over poisar river redevelopment issue in chembur