भाजपच्या कोअर बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून, यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

केंद्र सरकारला मे महिन्यात तीन वर्षे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी काय पावले उचलावी लागतील, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पुढील काही दिवसांत सरकारी पातळीवर, तसेच पक्ष पातळीवर विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्याचा विचारविनिमय या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. राज्यात सध्या कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत, असे असले तरीही सरकारच्या कामगिरीचा आढावा घेऊन राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, शेतकरी कर्जमाफीवरून निर्माण होणाऱ्या विरोधी वातावरणाचा सामना करणे, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

याचबरोबर राज्य कार्यकारिणी येत्या २५ व २६ तारखेला पिंपरी-चिंचवड येथे होत आहे. यामध्ये कोणते विषय घ्यायचे, कशापद्धतीने चर्चा करायच, तसेच आगामी काळातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवताना राज्यात खांदेपालट अथवा विस्तार करणे याबाबतही प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp core meeting discussion on issue