मालमत्ता करावरुन शिवसेना भाजपमध्ये जबरदस्त खडाजंगी; भाजप नगरसेविकेच्या मागणीला महापौरांचा नकार

राजेश मोरे
Saturday, 12 September 2020

भाजपच्या नगरसेविकेने सत्ताधारी शिवसेनेसह महापैार नरेश म्हस्के यांना लक्ष्य केले आहे.

ठाणे ः शहरातील रहिवाशांना मालमत्ता करात सूट देण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यावरून मनसेने यापूर्वी शिवसेनेवर टीका करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर भाजपच्या नगरसेविकेने सत्ताधारी शिवसेनेसह महापैार नरेश म्हस्के यांना लक्ष्य केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेकडून भाजपच्या अंतर्गत वादामुळेच भाजप नगरसेवकांना शहरातील विषयाची आठवण आल्याची टीका करण्यात आली.

उत्पन्न बंद झाल्याने वसई 'एपीएमसी'च्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड;  बाजार समितीचा मात्र स्वेच्छानिवृत्तीचा सल्ला

कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करण्याच्या मागणीवरुन भाजप आणि सत्ताधारी शिवसेनेत खडाजंगी सुरु झाली आहे. शिवसेनेने 25 वर्षात ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला. या विषयावर भाजपचे गटनेते किंवा शहराध्यक्षांनी टीका करणे अपेक्षित होते. परंतु केवळ गटनेते संजय वाघुले यांच्याबरोबर असलेल्या वादामुळेच मृणाल पेंडसे यांनी अशाप्रकारे टीका केल्याचे प्रत्युत्तर महापौर नरेश म्हस्के यांनी दिले.
दोन दिवसापूर्वी झालेल्या महासभेत तीन महिन्यांची मालमत्ता करमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली होती. परंतु यावरुन महासभेत चांगलाच गोंधळ झाला होता. भाजपने सत्ताधारी शिवसेना केवळ आश्वासने देत असल्याची टीका केली होती. त्यावेळी शिवसेनेनेही भाजपची सत्ता असलेल्या कोणत्या महापालिका अथवा नगरपालिकांमध्ये अशी सवलत दिली, याचा दाखला मागितला. त्यावरुन दोन्ही पक्षात चांगलीच खडाजंगी झाली.

 

25 वर्षे सत्ता उपभोगूनही शिवसेनेने ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसले. महासभेत महापौर म्हस्के यांनी मालमत्ता कर बाबत टोलवाटोलवी केली. तसेच भाजपमध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही. शहराच्या विषयावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर महापौरांनी उत्तर देणे अपेक्षित आहे.
- मृणाल पेंडसे,
नगरसेविका, भाजप

 

भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्यासोबत असलेल्या वादामुळेच आणि पक्षातील स्थान बळकट करण्यासाठी पेंडसे यांनी टीका केली. कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटल्याने मालमत्ता कर माफ करणे हा काही उपाय होणार नाही. भाजपला शहराची एवढीच चिंता असेल तर त्यांनी केंद्राकडून राज्य सरकारला थकीत असलेली देणी दिल्यास महापालिकेला निधी उपलब्ध होईल. 
- नरेश म्हस्के,
महापौर, ठाणे महापालिका.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The BJP corporator has targeted the ruling Shiv Sena in thane