esakal | BJP Leader Ashish Shelar Sarcastic Uddhav Thackeray Nawab Malik Comedy

बोलून बातमी शोधा

Ashish-Shelar-BJP
"महाराष्ट्रातील तेच 'हुषार' सत्ताधारी..."; भाजपचा ठाकरे सरकारला टोला
sakal_logo
By
विराज भागवत

कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती आहे. लसीकरण मोहिमेने वेग घेतला असताना लसतुटवडा निर्माण झाला. तशातच दररोज राज्यात ५०हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाउन लागणार की नाही? असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाउनला भाजपचा विरोध असून आधी गोरगरिबांना पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशभरात लॉकडाउन करताना कोणाच्याही खात्यात पैसे टाकले नव्हते असे काल राष्ट्रवादीचे नबाव मलिक म्हणाले. त्याला आज भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं.

"एका वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता, आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जनसहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच "हुषार" सत्ताधारी लॉकडाऊनॉशिवाय पर्याय नाही असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही किंवा लॉकडाऊनला विरोधही करत नाही. कारण जनतेचा जीव महत्वाचा! मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहोचवली. धान्य, निवारा दिला! आज मजूरांना ना पाणी, ना धान्य, ना कुठली मदत.. रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार! तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?", अशा शब्दात शेलार यांनी भाजप विरोधात बोलणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला.

दरम्यान, गेले काही दिवस राज्यात लॉकडाउन लागणार असं सांगितलं जातंय. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी लॉकडाउनच्या मुद्द्यावर चर्चा केली. या चर्चेदरम्यान लॉकडाउनशिवाय कोरोना साखळ तुटणार नाही असा सूर मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री आणि राज्यातील काही अधिकारी वर्गामध्ये दिसून आला. राज्यात लॉकडाउन लावायचा असेल तर जनतेला त्याआधी दोन-तीन दिवस कल्पना द्यावी असेही मत काही नेत्यांनी मांडले. तर हातावर पोट असणारे मजूर, छोटे व्यापारी आणि इतर कामगार वर्गासाठी पॅकेजची घोषणा करावी आणि मगच लॉकडाउन लावावं असं मत भाजपकडून मांडण्यात आले. या साऱ्या मुद्द्यांना एकत्रित करून सुवर्णमध्य काढण्यात येईल आणि लॉकडाउनबाबत मुख्यमंत्री आजच निर्णय जाहीर करतील असं मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी सांगितले.