'स्व. बाळासाहेबांचं हिंदुत्व तरी पाळा'; भाजप आणि शिवसेनेत रंगला कलगीतुरा

कृष्ण जोशी
Tuesday, 13 October 2020

मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अशी अपेक्षा आहे.

मुंबई ः मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नसली तरी त्यांनी किमान स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळावे अशी अपेक्षा आहे. सणासुदीच्या दिवसात मंदिरं उघडा किंवा बार रेस्टोरंट बंद करा, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

'हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी'; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्यावरून एकमेकांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वावरून एकमेकांना टोलेबाजी केली आहे. त्या वादात उडी घेताना भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. नवरात्र-दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसांत मंदिरं उघडली नाहीत तर तुम्हाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी किमान स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी विसरू नये, त्यांचे हिंदुत्व तरी पाळावे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी बार उघडण्यापूर्वी शंभर टक्के मंदिरं खुली केली असती. सणासुदीचे दिवस येत असताना तरी हिंदुंच्या भावना लक्षात घेऊन मंदिरं लौकरच उघडावी, असे आवाहनही भातखळकर यांनी केले आहे. 

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचे सडेतोड उत्तर; म्हणाले माझ्या हिंदूत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही

मंदिरं उघडायची नसतील तर यापूर्वी खुले केलेले बार व रेस्टोरंट बंद करा. केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतोय अशा खोट्या भूलथापा देणे बंद करा. कारण मंदिरं बंद असतानाही इतके दिवस महाराष्ट्र ही देशातील कोरोनाची राजधानी तुम्ही करून दाखवली होती. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पाळून मंदिरे त्वरेने खुली करा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ तुमच्यावर येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
चौकट

यासंदर्भात भातखळकर यांनी खालील ट्विट करून शिवसेनेला टोलाही लगावला आहे. 

BJP leader Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena on Hindutv

--------------------------------------------------------

 ( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena on Hindutv