पदाचे अवमूल्यन झाल्याचे पुस्तक वाचल्यावर वाटणार नाही, दरेकर यांची शरद पवारांना हमी

कृष्ण जोशी
Thursday, 28 January 2021

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

मुंबईः  विरोधी पक्षनेत्यांबाबत भावना व्यक्त करणे हा आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अधिकार आहे. मात्र विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी केलेल्या कामाचे पुस्तक पाहिल्यावर या पदाचे अवमूल्यन झाल्याचे आपल्याला वाटणार नाही, असे भावनिक पत्र प्रवीण दरेकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लिहिले आहे. 

दरेकर यांच्या काही विधानांवरून पवार यांनी नुकतीच त्यांच्यावर वरील आशयाची टीका केली होती. त्यामुळे व्यथित होऊन दरेकर यांनी पवार यांना आश्वस्त करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचे अवमूल्यन झाल्यासारखे वाटते, अशा आशयाचे मत नुकतेच आपण व्यक्त केले होते. मात्र आपल्यासमोर या प्रकरणाची एकच बाजू आल्याने आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्याची अशी समजूत झाल्याचे दरेकर यांनी या पत्रात दाखवून दिले आहे. महिला शेतकऱ्यांबाबत मी सरकारवर केलेल्या टीकेवरून आपण वरील मतप्रदर्शन केले होते. मात्र तो मुद्दा मी त्या महिलांशी प्रत्यक्ष बोलून माहिती घेऊनच मांडला होता. राजकीय अभिनिवेश न बाळगता सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचा तो विनम्र प्रयत्न होता, असेही दरेकर यांनी पवार यांना लिहिले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विधानपरिषदेला थोर विरोधी पक्षनेत्यांची परंपरा आहे, याची जाणीव मला पदभार स्वीकारला तेव्हाच झाली होती. ती जाणीव जागृत ठेवूनच वर्षभर ही जबाबदारी सांभाळली आहे. कोरोनाविरुद्ध राज्यसरकार लढत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचा अभिवाचन आणि सरकारला दिलं होतं. त्यानुसार जबाबदार विरोधी पक्षनेता या नात्याने आम्ही कोरोना केंद्रांना भेटी देऊन तेथील त्रुटी, रुग्णांच्या समस्या आणि त्याबाबतचे उपाय याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना तसेच मंत्र्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आणि 110 पत्र लिहून त्यांच्या कानावर घातली. कोकणात आलेले निसर्ग चक्रीवादळ तसेच नंतर राज्यात आलेली अतिवृष्टी याप्रसंगातही नुकसानभरपाईसाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- 'कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाला काही तारतम्य नाही'

मी एक लहान कार्यकर्ता आहे. राज्यातील आदरणीय आणि ज्येष्ठ नेते म्हणून आपल्याबद्दल माझ्या मनात पक्षनिरपेक्ष भावना आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून मी बजावलेले कर्तव्य आणि पदाचा सन्मान वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देण्याचा हा प्रयत्न आहे, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. 

नुकतेच आपण विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काही भावना व्यक्त केल्यात. देशाचे आदरणीय नेते म्हणून तो आपला अधिकारही आहे. मात्र आपल्या समोर प्रकरणाची एकच बाजू आत आल्यामुळे आपल्यासारख्या वरिष्ठ नेतृत्वाला वाईट वाटलं आणि पदाचा अवमूल्यन झाल्याची भावना आपल्या मनात निर्माण झाली. वर्षपूर्तीचा लेखाजोखा या माझ्या पुस्तकाची प्रत मी सर्वप्रथम आपल्याला सुपूर्द करणार आहे. ती वाचल्यानंतर या पदाचे अवमूल्यन झाल्याचे आपल्याला वाटणार नाही याबद्दल मला खात्री आहे. आपल्या सूचना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमीच नवउर्जा ठरतात अशी भावनिक कबुलीही दरेकर यांनी दिली आहे.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BJP leader Pravin Darekar wrote emotional letter NCP president Sharad Pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Pravin Darekar wrote emotional letter NCP president Sharad Pawar