धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क 
Friday, 15 January 2021

सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. 

मुंबई : सामाजिक न्याय खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते; मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. 

खापरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सामाजिक न्याय खात्याचे मंत्रिपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले, तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले, याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रिपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल, तर त्यातून समाजाला काय संदेश जातो, याचा विचार करावा लागणार आहे. मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड ती महिला करत आहे. मुंडे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप पाहता व या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्‍यक होते. राष्ट्रवादी कॉंगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील, असेही उमा खापरे यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

दबावाखाली चौकशी नको! 
एकीकडे स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी "शक्ती'सारखा कायदा आपण करतो. दुसरीकडे राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेणे आवश्‍यक आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. 

BJP Mahila Morchas statewide agitation for the resignation of Dhananjay Munde

ृ------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mahila Morchas statewide agitation for the resignation of Dhananjay Munde