राष्ट्रवादी हा ढोंगी पक्ष नैतिकतेचा बुरखा फाटला, मुंडेंप्रकरणी भाजपची टीका

कृष्ण जोशी
Thursday, 14 January 2021

राष्ट्रवादी काँग्रेस किती हा ढोंगी आणि अनैतिक पक्ष आहे हेच दाखवून देते, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षात चर्चा करावीशी वाटते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किती हा ढोंगी आणि अनैतिक पक्ष आहे हेच दाखवून देते, अशी जळजळीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुंडे यांच्यावर मुंबई एका महिलेने बलात्काराचे आणि लैंगिक छळाचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांची शाहनिशा केल्याशिवाय निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. आम्ही यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या भूमिकेवर भातखळकर यांनी कडाडून टीका केली आहे. 

हेही वाचा- मंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत धनंजय मुंडे यांनी केला मोठा खुलासा

अशा प्रकरणात खरे म्हणजे चर्चा करण्याचा काहीही संबंधच येत नाही. अशा प्रसंगी संबंधिताचा तत्काळ राजीनामा घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवायला हवा. त्याऐवजी चर्चा करू, असे म्हणणे योग्य नाही. यासंदर्भातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची विधाने म्हणजे बेशरमपणाचा कळस तर आहेच, पण त्यांच्या नैतिकतेचा बुरखा पूर्णपणे फाडणारी आहेत, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

72 तासांपूर्वी एका महिलेने पुराव्यांसहित बलात्काराचे गंभीर आरोप केले तरीही अद्याप यासंदर्भात पोलिसांनी एफआयआर नोंदविला नाही. त्यामुळे यात चर्चा करण्याचा काय मुद्दा आहे. अशा प्रकरणात संबंधितांचा तत्काळ राजीनामा घेऊन एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची गरज आहे. त्याऐवजी पक्षात चर्चा करावीशी वाटते हे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा किती ढोंगी आणि  अनैतिक पक्ष आहे हेच दाखवून देते, अशीही टीका भातखळकर यांनी केली आहे.

BJP MLA Atul Bhatkhalkar criticism on Dhananjay Munde case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Atul Bhatkhalkar criticism on Dhananjay Munde case