मारहाणीचे राऊतांकडून समर्थन, हा बेशरमपणाचा कळस भातखळकर यांची टीका

कृष्णा जोशी
Sunday, 13 September 2020

 निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेले समर्थन हा निर्लज्जपणाचा आणि बेशरमपणा कळस आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई:  निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेले समर्थन हा निर्लज्जपणाचा आणि बेशरमपणा कळस आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाल्यावर संयमाचा बांध तुटतो अशी प्रतिक्रिया यासंदर्भात संजय राऊत यांनी काल व्यक्त केली होती. त्याबाबत भातखळकर यांनी आज सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शर्मा यांना झालेल्या मारहाणीचा राऊत यांनी केलेले समर्थन निर्लज्जपणाचा बेशरमपणाचा कळस आहे. स्वतः राऊत यांनी यापूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्यावर घाणेरड्या भाषेत टीका केली आहे. दैनिक सामना मधूनही विविध व्यक्तींवर आणि मान्यवरांवर अशीच टीका होत असते. आता मात्र इतरांनी आपल्या व्यक्तींवर टीका केल्यावर त्यांना झालेल्या मारहाणीचे समर्थन करायचे, हा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता चांगलीच ओळखून आहे. 

अधिक वाचाः  ३६ मिनिटांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वाचा सविस्तर

या मारहाणीमुळे शिवसेनेने राज्यात गुंडाराज तर आणलेच आहे, पण राऊत यांनी त्याचे समर्थन करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे. सत्तेचा माज डोक्यात गेल्याचे हे लक्षण आहे. मात्र महाराष्ट्राची जनता विचारी असून हा माज उतरल्याशिवाय ती राहणार नाही. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाण प्रकरणी शिवसैनिकांवर जोपर्यंत अजामीनपात्र गुन्हे नोंदवले जात नाहीत तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही हे राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

अधिक वाचाः  मृत व्यक्तीच्या व्हायरल व्हिडिओविरोधात KEMमध्ये डॉक्टरांचे निषेध आंदोलन

तर शिवसैनिकांची प्रतिक्रिया उस्फुर्त होती, अभिव्यक्तीच्या नावाखाली स्वैराचार झाल्यावर संयमाचा बांध तुटतो. शिवसैनिकांची प्रतिक्रिया संतप्त आणि तितकीच उत्स्फूर्त होती. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे, मुख्यमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदाबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध तुटतो. म्हणूनच सगळ्यांनी जबाबदारीने एकमेकांचा आदर ठेवून वागल्यास ही वेळ येणार नाही. ही राज्यकर्त्यांसोबतच विरोधकांचीही जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी काल व्यक्त केली होती.

------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Bjp mla Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena leader Sanjay Raut


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp mla Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena leader Sanjay Raut