मृत व्यक्तीच्या व्हायरल व्हिडिओविरोधात KEMमध्ये डॉक्टरांचे निषेध आंदोलन

भाग्यश्री भुवड
Sunday, 13 September 2020

रुग्ण जिवंत असताना मृत घोषित केलेल्या संदर्भात केईएम रुग्णालय मुंबईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.  या घटनेचा निषेध म्हणून केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात निषेध आंदोलन केले.

मुंबई: रुग्ण जिवंत असताना मृत घोषित केलेल्या संदर्भात केईएम रुग्णालय मुंबईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.  या घटनेचा निषेध म्हणून केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात निषेध आंदोलन केले. यावेळी, गुन्हेगाराला अटक करा अशी मागणी डॉक्टरांनी केली. 

मुळात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ईसीजीची फ्लॅट लाईन रुग्णांच्या नातेवाईकांना दाखवून मृत झाल्याचे कळवले असता रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप अनावर होऊन रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांच्या मित्र मंडळींनी तेथील उपस्थित महिला निवासी डॉक्टरांवर बळजबरी करत अर्वाच्च भाषेत व्हेंटिलेटर सुरू करण्यास भाग पाडले. व्हेंटीलेटर सुरू असताना कृत्रिम श्वासोच्छ्वासामुळे छातीची हालचाल होते याला रुग्ण जिवंत असल्याचे प्रमाण मानून तिथे उपस्थितांनी त्या महिला डॉक्टरला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला.

अधिक वाचाः  नवी मुंबईच्या रुग्णांना दिलासा; रहेजा युनिर्व्हसलमध्ये नवे विलगीकरण केंद्र

एवढेच नव्हे तर हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरवून या कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचे षड्यंत्र केले. त्यामुळे, सर्वसामान्य जनतेचा विश्वास केईएम सारख्या दर्जेदार रुग्णालयासह शासकीय दवाखान्यावर कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अटक करा नाहीतर काम बंद आंदोलनाचा पवित्रा

या कोरोना काळात अविरत अखंड निस्वार्थपणे काम करणाऱ्या डॉक्टरांचा असा अमानुषपणे अपमान आणि छळ केल्याबद्दल तसंच जनतेमध्ये गैरसमज आणि संभ्रम पसरवणे बद्दल दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासंबंधी भोईवाडा पोलिसांना तक्रार दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्री वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांनी या प्रकरणांमध्ये तात्काळ लक्ष द्यावे आणि या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, मात्र तसे न झाल्यास निवासी डॉक्टरांच्या स्वाभिमान, सुरक्षा हित आणि अशा समाजकंटक प्रवृत्तीमुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊन डॉक्टरांवर हल्ले वाढण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता आम्हाला काम बंद केल्याशिवाय पर्याय गत्यंतर उरणार नाही, असा इशारा केईएम मार्ड प्रतिनिधींकडून देण्यात आला आहे.

--------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Doctors protest in KEM against viral video of dead person


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors protest in KEM against viral video of dead person