
"जसे मुंबईत बाळासाहेब ठाकरे, तसेच नवी मुंबईत दि. बा. पाटील"
नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव देण्याची आमदार प्रशांत ठाकूरांची आग्रही मागणी
पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) नामकरणावरील वाद गेले काही दिवस चर्चेत आहे. हा वाद आता चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जावी, यासाठी महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेना आग्रही आहे. पण, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मात्र हे फापसं रूचलं नसून आता हा वाद थोडा अधिकच प्रखर होताना दिसतोय. तशातच आता भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपली भूमिका ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. (BJP MLA Prashant Thakur Demands Di Ba Patil name to Navi Mumbai International Airport)
"जसा मुंबईत मराठी माणूस बाळासाहेबांमुळे टिकला.. तसाच नवी मुंबईत भूमिपुत्र दि.बा पाटील साहेबांमुळेच जगला.. कोणाच्या नावाला आमचा विरोध नाही, पण भूमिपुत्र लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले कार्य लक्षात घेऊनच, विमानतळाला त्यांचे नाव देण्याची आमची मागणी आहे. वर्तमानात राहून भविष्यातील पिढ्यांना आपल्या इतिहास पुरुषांचा ऐतिहासिक वारसा जपण्याची संधी देण्याची 'हीच ती योग्य वेळ' आहे. त्यामुळेच लोकनेते कै. दि. बा. पाटील साहेबांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा लोकाग्रह आहे", अशा शब्दात प्रशांत ठाकूर यांनी ट्वीटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, या नामकरणाच्या वादामुळे सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. विमानतळाच्या नामकरणावरुन प्रकल्पग्रस्त विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावास पसंती दर्शवली असली तरी मावळचाच भाग असलेल्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.