'पंचवीस वर्षांची शिवसेनेची मजबुरी काय? हे राऊत यांनी उघड करावे'; भाजप नेत्याचा सवाल

कृष्ण जोशी
Sunday, 27 September 2020

गेली पंचवीस तीस वर्षे शिवसेना ही भाजप बरोबर युती करण्यात धन्यता मानत होती. त्यामागची कारणे काय होती, मजबुरी काय होती, हे संजय राऊत यांनी स्पष्ट करावे.

मुंबई - गेली पंचवीस तीस वर्षे शिवसेना ही भाजप बरोबर युती करण्यात धन्यता मानत होती. त्यामागची कारणे काय होती, मजबुरी काय होती, हे संजय राऊत यांनी स्पष्ट करावे. शिवसेना केवळ सत्तेसाठी भाजपबरोबर होती का, की इतर कोणी सेनेला थारा देत नव्हते, म्हणून तो पक्ष भाजपबरोबर होता का, की हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रवादाच्या मुद्यावर सेना ही भाजपबरोबर होती, हे देखील राऊत यांनी सांगावे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

 अकाली दलाने एनडीए तून बाहेर पडल्याबाबत प्रतिक्रिया देताना, ते मजबुरीने बाहेर पडले, किंबहुना आम्हीदेखील मजबुरीनेच एनडीए मधून बाहेर पडलो, असेही वक्तव्य  राऊत यांनी केले होते. त्या वक्तव्याचा दरेकर यांनी वरीलप्रमाणे समाचार घेतला आहे. 

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेसनेत्याची खोचक टीका

ही शिवसनेची मजबुरी आहे का
गेली २५ ते ३० वर्षे भाजपा सोबत युती करुनच शिवसेनेचे राजकारण सुरु होते ही त्यांची मजबुरी होती का, त्याची कारणे काय होती, असा प्रश्नही दरेकर यांनी राऊत यांना विचारला आहे. सेना-भाजपने यंदाची विधानसभा निवडणुक युती करून लढवली होती. म्हणजे नैसर्गिक युती ही भाजपा बरोबर असताना त्यांना बाजूला ठेवुन महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का, याचे उत्तरही संजय राऊत यांनी द्यावे. गेल्या काही महिन्यांत राऊत यांनी वेगवेगळी उलटसुलट वक्तव्ये केली आहेत. पण सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे, असेही दरेकर म्हणाले.  

नवी मुंबई आयुक्तांचा आणखी दोन रुग्णालयांना दणका; अव्वाच्या सव्वा बीले आकारल्याने कारवाई

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिल सवलत म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ 
एकीकडे भरमसाठ वीजबिलांनी सामान्य ग्राहक त्रासलेला असताना मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देणे म्हणजे छोट्या वीजग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे. 

बेस्ट विद्युत उपक्रमाने मंत्र्यांच्या बंगल्यांना गेले काही महिने वीजबिले न पाठविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. 15 मंत्र्यांच्या बंगल्यांसह एकूण 17 शासकीय बंगल्यांना बेस्ट ने गेले चार-पाच महिने वीजबिले पाठवली नाहीत. दादा भुसे, हसन मुश्रीफ, अमित देशमुख, के. सी. पडवी, संजय राठोड हे मंत्री तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्या बंगल्यांना गेले पाच महिने बील पाठवले नाही. तर जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय  वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब यांच्या बंगल्यांना चार महिने बिल पाठवले नाही, असे  नुकतेच अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात उघड केले आहे.   

'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण

या प्रकारावर दरेकर यांनी वरीलप्रमाणे टीका केली आहे. सर्वसामान्य ग्राहक भरमसाठ वीज बिलाने त्रासलेला आहे, आधीच आर्थिक विवंचनेमुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. अशा वेळेला सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अशा प्रकारे बेस्ट उपक्रम आपल्याच पक्षाच्या बड्या मंत्र्यांची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे, असाही टोला दरेकर यांनी लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Pravin Darekar criticizes Sanjay Raut