
भाजप खासदार नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली
मुंबई- भाजप खासदार नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अज्ञानी आहेत, त्यांना सरकारी यंत्रणेचे ज्ञान किंवा काहीही अभ्यास नाही. त्यामुळेच लोकांचे पगार वेळेवर होत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवरही कंट्रोल नाही. एका बाजूला राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे. कशाचाच कशाला ताळमेळ नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही राणेंनी भाष्य केलं. मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पन्न देशाच्या कोणत्याही भागात जाऊन विकता येईल. शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पन्न मातोश्रीवर येऊन विकायचं का? असंही त्यांचा मातोश्री नावाचा पिंजरा बंद असतो. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. भाजपचं यश पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय. त्यामुळे शेतकरी आंदोलन घडवून आणलं जात आहे, असा दावा नारायण राणेंनी केला.
शिवसेना बदलली आहे, ही पूर्वीची शिवसेना नाही. औरंगाबादचं नामांतरण करण्याची घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी यापूर्वीच केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या आदेशाचा विसर पडलाय. त्यांना साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं वाटू लागलय, अशी बोचरी टीकाही नारायण राणेंनी यावेळी केली.