esakal | भाजप - राष्ट्रवादीचं येणार सरकार ? काय आहे सत्य असत्य..
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप - राष्ट्रवादीचं येणार सरकार ? काय आहे सत्य असत्य..

भाजप-राष्ट्रवादीचे सरकार येण्याच्या अफवांचे पीक 

भाजप - राष्ट्रवादीचं येणार सरकार ? काय आहे सत्य असत्य..

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई :  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असल्याच्या अफवांचे पेव आज दिवसभर फुटले होते. 

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष अद्यापही चर्चेच्या पायरीवरच अडकले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे जाऊ नये, यासाठी भाजपचे दिल्लीतील नेतृत्व सक्रिय झाल्याचे समजते. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत असून सतत शरद पवारांच्या संपर्कात आहेत, तसंच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्यूला मांडला असून त्यानुसार, जुलै 2022 मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद आणि राज्यातील सत्तेत मोठा वाटा देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. 

मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त सत्ता स्थापण्याचा प्रयत्न असताना, भाजपचे नेतेही सर्व घडामोडींकडे बारीक नजर ठेवून आहेत. विशेषत: भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यात लक्ष घातले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा ठाम विश्वास भाजपच्या गोटात व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विलंबामुळे आधीच शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या तीन पक्षांची सत्ता स्थापन होणे कठीण असून, भाजपशी जुळवून घेण्याशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नसेल, असाही सूर भाजपमध्ये आहे. त्यादृष्टीने डावपेच आखले जात आहेत. 

दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत मिळून लवकरच सरकार स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला आहे. "शरद पवार आणि आमच्या युतीबद्दल चिंता करु नका, लवकरच शिवसेनेच्या नेतृत्त्वातील संयुक्त सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल, एक स्थिर सरकार असेल," असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे, 


शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला 

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमुख शरद पवार नरेंद्र मोदींची भेट घेत राज्यातील शेतकऱ्यांना मदत घोषित करण्याची मागणी करणार आहेत. यावेळी राज्यातील सत्तापेचावरही चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. "राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. शरद पवार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणार आहेत," अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. 


कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आज बैठक 

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न असले तरी त्यातील अडथळे दूर झालेले नाहीत. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची कॉंग्रेसची प्राथमिक तयारी होती. मात्र, कॉंग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. हा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. कॉंग्रेस नेतृत्वाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास अद्यापही होकार किंवा नकार कळविलेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी मंगळवारी अहमद पटेल, ए. के. ऍन्टोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली. सत्ता स्थापनेचा चेंडू आता कॉंग्रेसच्या कोर्टात असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येते. कॉंग्रेसचे राज्यातील नेते मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत.  

webTitle : BJP NCP to form government is nothing but rumours