सत्तेची उब मिळाल्याने आव्हाड ओबीसींना विसरले; भाजप ओबीसी मोर्चाची टीका | Jitendra Awhad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Pratik karpe
सत्तेची उब मिळाल्याने आव्हाड ओबीसींना विसरले; भाजप ओबीसी मोर्चाची टीका

सत्तेची उब मिळाल्याने आव्हाड ओबीसींना विसरले; भाजप ओबीसी मोर्चाची टीका

मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सत्तेची उब मिळाल्याने ते आता ओबीसी बांधवांना (obc community) विसरले आहेत. त्याचमुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, ओबीसींना लढायचेच नसते, अशी अपमानकारक विधाने आव्हाड करीत असल्याची टीका भाजप राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे सदस्य व मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे (Pratik karpe) यांनी केली आहे. (BJP pratik karpe criticizes Jitendra awhad on obc community related statements)

हेही वाचा: 'चोर सोडून संन्याशाला फाशी'; मंगलप्रभात लोढा यांची प्रशासनावर टीका

आव्हाड यांनी नुकतीच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजावर वरीलप्रमाणे टीका केली होती. ओबीसींच्या आरक्षणासाठी मंडल आयोग आला, पण त्यासाठी लढायची वेळ आली तेव्हा लढाईसाठी ओबीसी मैदानात नव्हते. तर लढायला होते ते महार आणि दलित, ओबीसींना लढायचेच नसते. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा इतका पगडा बसलाय की आपण श्रेष्ठ आहोत, असे त्यांना वाटते. पण चार-पाच पिढ्यांपूर्वी आपल्या बापांना-आज्यांना मंदिरप्रवेश नव्हता हे ते विसरलेत, असे उद्गार आव्हाड यांनी काढले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडियो देखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाले आहेत. त्यासंदर्भात कर्पे यांनी वरीलप्रमाणे टीका केली आहे.

मुळात आव्हाड हे मुंब्र्यासारख्या मतदारसंघातून निवडून येत असल्याने मतांसाठी ओबीसींची गरजच नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. तेथून निवडून येण्यासाठी ते नेहमीच अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करतात. किंबहुना त्याच प्रयत्नांमधून त्यांनी वादग्रस्त व्यक्तींच्या नावेही समाजसेवा केली होती. ओबीसी समाजापेक्षा वादग्रस्त व्यक्तींवर आव्हाड यांचा जास्त विश्वास आहे हे समाजाचे दुर्दैव आहे, असाही आरोप कर्पे यांनी केला.

हेही वाचा: प्रवीण दरेकर मजूर नाहीत; सहकार विभागाने ठरवलं अपात्र

खरे पाहता ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची सरकारमधील तीनही पक्षांची इच्छाशक्तीच नसल्याचे वारंवार समोर येत आहेत. त्याचमुळे वादग्रस्त व्यक्तींच्या नावे रुग्णवाहिका सुरु करणाऱ्या आव्हाडांकडून ओबीसींवर टीका होणे अपेक्षितच आहे. या रुग्णवाहिकेला ओबीसी समाजातील अग्रगण्य व्यक्तींचे नाव देण्याचा मोठेपणा आव्हाड यांना दाखवता आला नाही, यातच सर्वकाही आले, असा टोलाही कर्पे यांनी लगावला आहे.

आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि सत्तेतील घटक पक्षांतील समन्वयाच्या अभावामुळे मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही बासनात बांधण्याचे काम ठाकरे यांनी करून दाखविले आहे. ओबीसी आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. मुख्यमंत्र्यांनीच हे धोरण ठेवल्याने आव्हाड यांच्यासारखे मंत्रीही असेच बोलणार हे निश्चितच आहे. असे झाले तर ओबीसी आरक्षण कसे टिकणार, असा प्रश्नही कर्पे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top