
Mumbai News : भाजपाचा भगवा रंग हा भोगाचं प्रतिक; विद्या चव्हाण
डोंबिवली - बेरोजगारांना नोकऱ्या व महागाई कमी करु असे मोदी सरकारने सांगितले होते. गेल्या आठ वर्षात किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या, रुपयात घसरण झाली का ? हे प्रश्न सोडविण्यात मोदी सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे.
या प्रश्नांवरुन नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार वेगवेगळे प्रश्न निर्माण करत आहे. हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. हे हिंदूत्व पूर्णपणे ढोंगी आहे, यांना हिंदूत्वाची काही पडलेली नाही. हिंदू धर्म धोक्यात आहे असे म्हटले जाते, तसे काही नाही.
आम्ही सर्व हिंदू आहोत. भगवा रंग हा त्यागाच प्रतिक आहे, पण भाजपचा भगवा रंग हा भोगाच प्रतिक आहे. निवडून यायचे, भगवे वस्त्र परिधान करायचे त्याने काही होत नाही. आम्हाला धर्म शिकवायची काही गरज नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी भाजपावर हल्ला बोल चढविला.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने राज्यभरात जागर सावित्रीच्या लेकींचा, जागर महागाई विरोधात, जागर बेरोजगारी विरोधात या जनजागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली शहरात दोन दिवसीय या जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी कल्याण पूर्वेत विद्या चव्हाण आल्या होत्या.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या,
महागाई जागर यात्रा ही महागाई विरोधात आणि बेरोजगार विरोधातील आहे. गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने घोषणा होती की दरवर्षी 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार.
आठ वर्षात त्यांनी 16 कोटी तरुणांना नोकऱ्या सरकारने देणे आवश्यक होते. महागाई कमी करु असे सांगितले होते, रुपयाची घसरण अद्याप थांबलेली नाही. अदानी, अंबानी यांना संपूर्ण देश मोदींनी विकून टाकला आहे.
त्याविषयी कोणी काही बोलत, नाही, बोलायचे देखील नाही. का तर लोक घाबरतात कारण ईडीची चौकशी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाडी पडतील. आम्हा महिलांना महागाई कमी झाली पाहीजे, मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहीजे एवढेच हवे आहे.
हे महत्वाचे प्रश्न ज्यामध्ये मोदी सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. या प्रश्नावरुन नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नविन प्रश्न निर्माण केले जातात. हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. हे हिंदूत्व पूर्णपणे ढोंगी आहे, यांना हिंदूत्वाची काही पडलेली नाही.
तोडा आणि राज्य करा हा ब्रिटीश सरकारचा नियम होता तेच हे सरकार करत आहे. याविषयी नागरिकांना जागरुक करण्याचे काम आम्ही करत आहोत.
इतिहास आम्ही शिकलो ओहोत...
संभाजी राजे, शिवाजी महाराज कोण होते याचा वाद निर्माण केला जात आहे. इतिहास आम्ही शिकलो आहोत. संभाजी राजे, शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे, त्यांनी फक्त 130 कोटी जनतेचे प्रश्न महागाई आणि बेरोजगारीवर बोलावे. धर्म कोणी फोडले, कोणाची पूजा करायची, कोणाशी लग्न करायचे हा प्रत्येकाच्या घरातील वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला सामाजिक स्वरुप देऊ नका.
भाजपचा भगवा रंग भोगाच प्रतिक...
हिंदू धर्म खतरे मै है बोलले जाते तसे काही नाही. आम्ही सर्व हिंदू आहोत. भगवा रंग हा त्यागाच प्रतिक आहे, पण भाजपचा भगवा रंग हा भोगाच प्रतिक आहे निवडून यायचे भगवे वस्त्र धारण करायचे मोठे कुंकू लावायचे याने काही होत नाही.
गुंड माणसं आहेत हे सगळे. जिलेबी बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे नुकतेच समोर आले आहे. धर्माच्या नावाखाली काय चालते यावर आम्हाला बोलायचे नाही. आमचा धर्म आम्ही आमच्या घरात पुजतो. धर्म म्हणजे आमच्या घरात आमच्यावर लहान पणापासून झालेला संस्कार आहे. त्याप्रमाणे आम्ही वागतो ते आम्हाला शिकविण्याची गरज नाही असेही विद्या यांनी सांगितले.
मोदींना सत्ता सांभाळता येत नाही...
देहू येथे नुकतीच गेले होते. तेथे संत तुकारामांचा वेश परिधान केलेल्या मोदींचा फोटो लागला होता. संतांचे वेश परिधान करणे आणि लोकांना फसवणे त्यांनी बंद करावे. अलिशान गाड्या, विमानातून फिरायचे. महागडे कपडे परिधान करायचे आणि म्हणायचे मी सन्याशी आहे. तुमचे सन्याशी पण आम्हाला कळले आहे.
त्यामुळे आता हे सगळं थांबवा असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. मोदी साहेब आता हा त्रास नको असे म्हणत त्या म्हणाल्या, तुम्हाला सत्ता सांभाळता येत नाही. मनमोहन सिंग सरकार अर्थनिती तज्ञ होते.
शरद पवार हे कृषीमंत्री होते, त्यांनी कृषी मध्ये इतके प्रचंड काम केले आहे. शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. मोदी सरकारने शेतकऱ्याची दुर्दशा केली आहे. तुम्ही हा देश बर्बद करु नका असा सल्ला विद्या यांनी पंतप्रधानांना देऊ केला आहे.
अमोल कोल्हेंनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यास आनंद...
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी सोडून का चालले आहेत ? हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. माझा दौरा हा महागाई आणि बेरोजगारी विरोधात आहे, त्यामुळे मी याविषयी बोलू इच्छित नाही. मात्र महागाई आणि बेरोजगारी विरोधात कोल्हे सभागृहात प्रश्न का विचारत नाही असा प्रश्न खरेतर तुम्ही पत्रकारांनी कोल्हेंना विचारला पाहीजे. त्यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केल्यास मला आनंदच होईल असे विद्या चव्हाण म्हणाल्या,
चित्रा वाघ यांनी मोदींची भेट घ्यावी...
चित्रा वाघ यांनी मोदी साहेबांना जाऊन भेटावं, त्यांना सगळं सांगावं. इतकेच नव्हे तर सेन्सॉर बोर्ड हा केंद्र सरकारच्या हातात आहे.
त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला या संदर्भात सेन्सॉर बोर्ड कडून पत्र देऊन नग्न शरीर व अश्लील गाणी दाखवू नका असे सांगावे. सेन्सॉर बोर्ड हे सगळे करु शकते, मात्र सगळ्यांनाच अश्लीलता मान्य असल्यामुळे सगळेच मुग गिळून गप्प आहेत.