esakal | ठाण्यात कमळ फुलवण्याची रणनीती; कार्यकारिणी बैठकीत आशीष शेलारांचे तयारीचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात कमळ फुलवण्याची रणनीती; कार्यकारिणी बैठकीत आशीष शेलारांचे तयारीचे आवाहन

मुंबई महापालिकेत आपले थोड्या फरकाने बहुमत हुकले होते, पण यामुळे आपण हार मानायची नाही. उलट बिहारमध्ये भाजपला हरविण्यासाठी अनेक पक्ष एकत्रित आल्यावरही भाजपचा विजय झाला, हे लक्षात ठेवले पाहिजे

ठाण्यात कमळ फुलवण्याची रणनीती; कार्यकारिणी बैठकीत आशीष शेलारांचे तयारीचे आवाहन

sakal_logo
By
राजेश मोरे

ठाणे : मुंबई महापालिकेत आपले थोड्या फरकाने बहुमत हुकले होते, पण यामुळे आपण हार मानायची नाही. उलट बिहारमध्ये भाजपला हरविण्यासाठी अनेक पक्ष एकत्रित आल्यावरही भाजपचा विजय झाला, हे लक्षात ठेवले पाहिजे. येत्या वर्षभरावर ठाणे महापालिकेची निवडणूक आली आहे. या निवडणुकीतही हे सर्व पक्ष एकत्र येणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेचे गणित कठीण असले तरी हा पेपर सोपा करण्यासाठी बुथ स्तरावर जाऊन काम करा, असे आवाहन भाजपचे ठाण्याचे प्रभारी आमदार आशीष शेलार यांनी केले. 

हेही वाचा - दिवाळी खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठी गर्दी; नागरिकांनी सोडली कोरोनाची भीती

भाजप ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणीची पहिली बैठक जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 12) सायंकाळी पार पडली. या बैठकीत शेलार बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार व भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले आदी उपस्थित होते. 

शेलार पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेत आपले 31 नगरसेवक होते, ते आपण 82 पर्यंत नेले. येथे थोडक्‍यात बहुमत हुकले. त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक जरी अशक्‍य वाटत असली तरी शक्‍य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकूणच आगामी ठाणे महापालिकेच्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने तयारी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचा - कोरोना ओसरला बाजार बहरला! किरकोळ दुकानदारांना अनेक महिन्यानंतर दिलासा

"वन बुथ टेन युथ' 
बुथ स्तरापर्यंत जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याने ज्या काही केंद्र सरकारच्या योजना आहेत, त्या पोहचविल्या पाहिजेत. "वन बुथ टेन युथ' अशा पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यानी घराघरांत जाऊन या योजना सर्वापर्यंत येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी केले. बिहार निवडणुकीला जे यश मिळाले, त्या मागे कार्यकर्त्यांनी खालपर्यंत केंद्राच्या ज्या योजना आहेत, त्या नेल्यानेच मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. संघटनात्मक बाजू भक्कम करून तळागळापर्यंत काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 
 

BJP strategy in Thane Ashish Shelars appeal for readiness in the executive meeting 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )