भाजप महिला नेत्याच्या सोनू सूदला सल्ला,तर संजय राऊतांवर टीका 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 10 June 2020

संजय राऊत यांच्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी कठोर शब्दांत टीका केली. तसंच संजय राऊतांवर टीका करतानाच वाघ यांनी सोनू सूदला एक सल्लाही दिला आहे. 

 

मुंबई- अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊनच्या काळात इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. सोनूनं केलेल्या कामावर रविवारी सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली होती.  यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केले. एकीकडे सोनूच्या कामाची चर्चा आणि कौतुक देशभरात झालं. दुसरीकडे सामनाच्या अग्रलेखात टीका झाली. त्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी कठोर शब्दांत टीका केली. तसंच संजय राऊतांवर टीका करतानाच वाघ यांनी सोनू सूदला एक सल्लाही दिला आहे. 

चित्रा वाघ यांनी व्हॉट्सअॅपवर आलेला एक मॅसेज ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे. सोनू सूदचं कौतुक करतानाच वाघ यांनी त्याला एक सल्लाही दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, 'डिअर सोनू सूद, तू खूप चांगलं काम करत आहेस. राऊतांकडं लक्ष देऊ नकोस. आपल्याला रोगाशी लढायचं आहे. रोग्याशी नाही...

या ट्विटच्या माध्यमातून वाघ यांनी संजय राऊत यांची तुलना एक प्रकारे रुग्णाशी केली आहे. 

राम कदमांचीही संजय राऊतांवर टीका 

संजय राऊतांच्या टीकेवर भाजप नेते राम कदम यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना रुग्णांना महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये जागा नाही म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत. प्रत्येक घरात उपासमार सुरू आहे. अशा वेळी तुम्ही गरिबाला एका पैशाची मदत केली नाही. दुसरे करतात त्यांना तरी करू द्या,' असं राम कदम यांनी राऊत यांना सुनावलं आहे.

जयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...
 

काय म्हटलं होतं अग्रलेखात 

ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न 

महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.

मजुरांच्या पायपीटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय ?

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता

कोरोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,' असा प्रश्न लेखात उपस्थित केलाय. 'सोनू सूदला मदत करणाऱ्या यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार ही व्यक्ती आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. सूद हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP women leader Sonu Sood's advice, criticism of Raut