समाजमाध्यमांद्वारे भाजपचा नवदहशतवाद, कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

कृष्ण जोशी
Wednesday, 7 October 2020

भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीर चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून, हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटचा सविस्तर तपशील पाहिल्यास ते सरकारविरोधात विचारपूर्वक नियोजित केलेले कटकारस्थान आहे. 
 

मुंबई ः भाजपचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला असून, हा लोकशाहीविरोधात कट आहे. या माध्यमातून समाजात अशांतता पसरवणे तसेच विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करणे असेही प्रकार होऊ शकतात. या नवदहशतवादाचे समूळ उच्चाटन करा, अशी मागणी महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे. 

महिलांना शस्र बाळगण्याची परवानगी द्या, शिवसेनेची मागणी

यासंदर्भात आज सावंत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांची भेट घेतली. या वेळी पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, रत्नाकरसिंह उपस्थित होते. या नवदहशतवाद बदनामी मोहिमेचा ट्‌विटरवरून मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला. पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये या कंपन्यांची नावे, सोशल मीडियावरील खरी व फेक अकाऊंटची माहिती आहे. यासंदर्भात चौकशीचे आश्‍वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती सावंत यांनी दिली.
 
सावंत म्हणाले की, भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीर चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून, हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटचा सविस्तर तपशील पाहिल्यास ते सरकारविरोधात विचारपूर्वक नियोजित केलेले कटकारस्थान आहे. 

या ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार वापरकर्त्याने तीन महिन्यांत 40 हजार ट्विट/पोस्ट केल्या. यातील बहुतांश ट्विटर हॅंडलने दर मिनिटाला ट्विट्‌स केल्या. हे सर्व ट्विट सुशांतसिंह राजपूतसंदर्भात करण्यात आले, त्यांचे हॅशटॅगही एकच आहेत. महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींमार्फत हे केल्याचे यावरून स्पष्ट होते, असेही सावंत म्हणाले. 

कृत्रिम जनमत बनवण्याचा प्रयत्न 
मुख्यमंत्री हे आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असून, त्यासाठीच मुंबई पोलिस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता. गोबेल्स तंत्राची ही विकसित आवृत्ती असून, त्यावर आरूढ होत भाजपचे नेते कृत्रिम जनमत बनवत आहेत, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, असेही सावंत म्हणाले. 

पालघरमधील दोन साधूंच्या हत्या तसेच दिल्ली दंगली या वेळीही हीच पद्धती वापरण्यात आली होती. भविष्यातही अशाच पद्धतीने समाजात अशांतता पसरवली जाऊ शकते. तसेच विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
- सचिन सावंत, कॉंग्रेस प्रवक्ते 

(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's new-terrorism through social media, Congress spokesperson Sachin Sawant's allegation