अमली पदार्थांची काळी दुनिया

अनिश पाटील
रविवार, 22 एप्रिल 2018

एमडी मुंबईत पहिल्या क्रमांकावर 
८०-९० च्या दशकात कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती.
सध्या मशरूम, फ्लॅक्का, स्पाईस या अमली पदार्थांना मागणी आहे.
ड्रग्जचा व्यापार झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत पसरला आहे.
बिनधोक नशेचा पर्याय म्हणूनही आहारी जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक
अमली पदार्थांचा व्यवसाय 
कमी मेहनत जास्त पैसा म्हणजे

देशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही सुरक्षा यंत्रणांना आला नाही, एवढे हे गूढ आहे. ८०-९० च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. काळ बदलला तसा हा व्यवसायही तितक्‍याच वेगाने बदलला. आता कोकेन, ब्राऊन शुगरला मागे टाकून अत्यंत जहाल अशा अमली पदार्थांनी त्यांची जागा घेतली आहे... 

अशी होते देवाणघेवाण
अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचे व्हॉटसॲप ग्रुप किंवा फेसबुकवर एका सांकेतिक भाषेत कोड वापरून पार्टी होते. 

या पार्टीत कोकेन, केटामाइन आणि टूसीबीसारखे अमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुण पिढी लाखो रुपयांची उधळण करते. 

काही पंचतारांकित हॉटेलमध्ये अमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठमोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कुरिअरद्वारे तस्कर हे अमली पदार्थ पार्टीत आणतात. 

त्यामुळे शहरातील पंचतारांकित हॉटेल आणि इव्हेंट मॅनेजमेंट आणि कुरिअर कंपन्या एएनसीच्या रडारवर आहेत.

यंत्रणेला चकवा
रासायनिक अमली पदार्थ वेगळे करण्याचे काम कोणत्या कारखान्यात सुरू आहे, याचा शोध लावणे तसे अवघड आहे. या औषधांच्या खपात अनपेक्षितपणे वाढ झाल्यास त्या ठिकाणी छापा टाकून तस्करांचा छडा लावला जात असे; पण डॉक्‍टर शॉपिंग या नव्या कार्यप्रणालीचा वापर करून तस्कर एकाच विभागातील दुकांनातून प्रतिबंधित औषधे न घेता शहरातील विविध दुकानांतून खरेदी करत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अमली पदार्थविरोधी विभागाला कठीण जात आहे.

विक्रेत्यांची चलाखी
भाई, ‘एक शिवा, और दो बुद्धा देना’ असे कोणी बोलत असेल, तर ते देवांबद्दल नसून ते अमली पदार्थ विक्री करत आहेत असे समजा. कारण आता अमली पदार्थ विक्रेत्यांनी त्यांना चक्क देवता आणि धर्मगुरूंची नावे दिली असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

व्यसनाधीनतेची लक्षणे
 ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली मुले अधिक निष्काळजी होतात. त्यांचे स्वत:कडे लक्ष नसते. कपड्यांवरही लक्ष देत नाहीत. अनेक वेळा दाढी करत नाहीत, अंघोळही करणे टाळतात.
व्यसनात गुरफटलेली व्यक्ती एकांत पसंत करते. कुटुंबीय, इतर नातेवाईकांपासून दूर राहतात. जुने मित्र सोडून त्यांच्यासारख्याच अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या मुलांसोबत मैत्री करतात.
त्यांच्या हालचालींमध्ये शिथिलता येते. खेळात उत्तम असलेली मुलेही खेळांपासून दूर राहतात. 
अतिसेवन करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ राग येतो. पालकांच्या अंगावर ओरडणे असे बदलही मुलांमध्ये दिसतात.

एलएसडीची चलती 
एलएसडीचा कमी क्षमतेचा थेंब तीन ते चार हजार रुपयांत देण्यात येतो. त्याला सांकेतिक भाषेत लॉर्ड शिवा म्हणतात. हा थेंब पेपरवर टाकण्यात येतो. त्यावर शिवाचे चित्र असते. खुल्या बाजारात त्याची किंमत पाच हजार रुपये आहे.
मध्यम क्षमतेचा थेंब प्रत्येकी सहा ते सात हजार आहे. सांकेतिक भाषेत त्याला लॉर्ड गौतम बुद्ध म्हणतात. खुल्या मार्केटमध्ये त्याची किंमत आठ हजार आहे.
सर्वांत उच्च क्षमतेचा थेंब प्रत्येकी १० हजार रुपयांना असतो. खुल्या बाजारात त्याची किंमत १२ हजार आहे. त्याला सांकेतिक भाषेत दलाई लामा म्हणतात. खुल्या बाजारात त्याला सर्वाधिक मागणी आहे. एलएसडी पेपर हा पार्टीमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो. 
 एलएसडीचा लहानसा तुकडा जिभेखाली ठेवल्यानंतर नशा करणाऱ्याला आपण वेगळ्या जगात असल्याचा भास होतो. पब, डिस्कोथेकमध्ये त्याला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे एलएसडीचा रक्तातील अंश केवळ दोन तासांपुरता मर्यादित राहतो. तसेच एखाद्या वेळेस या ड्रग्सचे सेवन केलेल्या व्यक्तीच्या रक्ताची दोन तासांनंतर तपासणी केली, तर त्याचा अहवाल निगेटिव्ह येतो. त्यामुळे कायदेशीर कचाट्यात न अडकण्यासाठी धनाढ्य त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. 
 रेव्ह पार्ट्यांमध्ये विशेष करून याच ड्रग्सचा वापर होतो. रॉन (एमडी) याला पूर्वी म्याव म्याव, चाची या नावाने ओळखले जात होते; मात्र या एमडीला ड्रग माफिया यांनी नवीन ओळख करून दिली. त्याला सध्या कपडा, बुक असे सांकेतिक भाषेत ओळखण्यात येते. एमडी मागणारे १ बुक, एक कपडा (एका वेळचे) अशी मागणी करीत आहे.

तंत्रज्ञानाचा वापर
परदेशात डॉक्‍टर शॉपिंगला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. डॉक्‍टरांचा संगणक व औषधाच्या दुकानांमधील संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डॉक्‍टरांनी एखाद्या रुग्णाला या औषधाची चिठ्ठी दिल्यास त्याची पूर्ण माहिती या यंत्रणेद्वारे औषध विक्रेत्यांना कळते. त्यामुळे ‘ओव्हर द काऊंटर’ औषधांची खरेदी करणे तस्करांना कठीण जाते; पण आपल्याकडे अद्याप ही यंत्रणा अस्तित्वात आली नाही, अशी माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली. परदेशात होणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तेथे ही प्रतिबंधित रसायने मिळवणे कठीण असते. परिणामी, आंतरराष्ट्रीय तस्कर यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. याचाच फायदा घेऊन भारतीय तस्कर मोठ्या प्रमाणात ही रसायने निर्यात करून कमाई करीत आहेत.

तरुणाईची दिशाभूल!
 अमली पदार्थांची विक्री करणारे त्याचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून या व्यसनात अडकतात. मेफेड्रॉनमुळे झीरो फिगर मिळते, ऊर्जा मिळते असा अपप्रचार आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व नाचण्यासाठी बारबाला सध्या मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत. सध्या मुंबईतील ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी  आहेत.

अमली पदार्थांची विक्री करणारे त्याचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून या व्यसनात अडकतात. मेफेड्रॉनमुळे झीरो फिगर मिळते, ऊर्जा मिळते असा अपप्रचार आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व नाचण्यासाठी बारबाला सध्या मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत. सध्या मुंबईतील ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी  आहेत.

पश्‍चिम उपनगरातील अशीच उच्चभ्रू घरातील मुलगी या तस्करांच्या जाळ्यात अडकली होती. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) तिचे समुपदेशन केले. तसेच शाळेतील मुलांना हेरण्यासाठी कॅण्डी व चॉकलेट्‌मध्येही अमली पदार्थ भरून त्याला याचे व्यसन लावण्यात येते. अमली पदार्थ हे स्लो पॉयझन आहे. सुरुवातील शरीरात एखादी ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतर मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा असे आजार जडतात. 

फेसबुक नावाने प्रसिद्ध असलेले फ्लॅक्का
सर्वांत भयानक अमली पदार्थ म्हणून प्रचलित असलेले फ्लॅक्का ड्रग्स हासुद्धा झोंबी ड्रग्स म्हणूनही प्रचलित आहे. याचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे भान हरपते. तो आक्रमक होतो. झोंबीसारखे वागतो. त्यामुळेच झोंबी ड्रग्स म्हणून हे प्रचलित आहे. फ्लॅक्का याचे रासायनिक नाव अल्फा-पीव्हीपी आहे. पावडर अथवा गोळ्यांच्या स्वरूपात हे ड्रग्स असते. त्याचे सेवन धूम्रपान अथवा इंजेक्‍शनद्वारे केले जाते. काही देशांमध्ये त्याच्यावर फेसबुकसारखे चिन्ह असल्यामुळे ते सांकेतिक भाषेत फेसबुक म्हणूनही प्रचलित झाले होते. त्यानंतर व्हॉट्‌सॲप, इतर सोशल मीडिया व ॲप्लिकेशन आदी लोगोंमध्येही उपलब्ध करण्यात आले. हे ड्रग्स एवढे भयानक आहे, की याच्या सेवनानंतर अनेक तरुणांना रुग्णालयात भरती करावे लागले होते, पण हे सेवन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यात प्रचंड शक्ती निर्माण झाली आहे असा भास होतो. त्याच्या हालचालीही तशाच असतात. हे अमली पदार्थ डार्कनेटच्या माध्यमातून देशातही सहज उपलब्ध होऊ शकते.

‘डॉक्‍टर शॉपिंग’चे आव्हान
भारतातील ड्रग माफियांनी आपल्या पाताळयंत्री कारवायांसाठी आता येथील डॉक्‍टरमंडळींचा राजरोस वापर सुरू केला आहे. तस्कर डॉक्‍टरच्या चिठ्ठीद्वारे ‘ओव्हर द काऊंटर’ औषधे खरेदी करून त्यातील प्रतिबंधित रसायने वेगळी करतात. त्यानंतर ही रसायने परदेशात ड्रगनिर्मितीसाठी पाठवली जातात. तस्करांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीला ‘डॉक्‍टर शॉपिंग’ असे म्हटले जाते. याला आळा घालण्यासाठी सध्या तरी भारतात प्रभावी असा कोणताही उपाय उपलब्ध नसल्याने एकप्रकारे ड्रगमाफियांनी सरकारपुढेच आव्हान निर्माण केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बाजारातील अनेक औषधांपासून अमली पदार्थ तयार करण्यासाठीची रसायने वेगळी करता येतात. कधी कधी औषधविक्रेते डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवायच अशी प्रतिबंधित औषधे विकतात. त्यानंतर हा औषध साठा रासायनिक कारखान्यात एकत्र करून त्यातील एफिड्रीन व कॅटामाईन ही प्रतिबंधित रसायने वेगळी केली जातात.

हायटेक व्यवहार
अमली पदार्थांचा खरेदी-विक्री व्यवहार तितकासा सोपा नाही.बिटकॉईनवर हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशिप घ्यावी लागते. बिटकॉईनवर ही मेंबरशीप मिळते. जोपर्यंत या तस्करांना तुम्ही खरेच अमली पदार्थांच्या खरेदीसाठी मेंबर होत आहात याची खात्री पटत नाही, तोपर्यंत तुम्हाला मेंबर करून घेतले जात नाही. मुंबई पोलिसांनी नुकतेच या तस्करांना जाळ्यात अडकवण्यासाठी अशा प्रकारच्या बिटकॉईनची खरेदी करून अडकवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांना अपयश आले. एएनसीच्या पोलिसांनी कांदिवलीत बिटकॉईनद्वारे एलएसडी पेपरची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यातील मुख्य आरोपी फरहान अखिल खान हा या इंटरनेटवरील साईटवर मेंबर असल्याचे तपासात पुढे आले होते. त्या वेळी त्याने तब्बल साडेदहा लाख रुपये या एलएसडी पेपरसाठी दिल्याचे त्याने पोलिस चौकशीत सांगितले होते. त्यामुळे आता अशा व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर आहे. 

नायजेरियन तस्कर अग्रेसर
मुंब्रा, दिवा, मिरा रोड, वसईबरोबरच नवी मुंबईतील काही भागांत वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या नायजेरियन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन अशा अनेक नव्या अमली पदार्थांची तस्करी भारतात सुरू केल्याने या नव्या अमली पदार्थांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. भारतात बेकायदा आलेले ९५ टक्के नायजेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे काम करतात. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी पोलिसांनी २०१६ मध्ये १६ नायजेरियनना अटक केली होती; तर २०१७ मध्ये सुमारे २३ नायजेरियनना अटक केली आहे. या टोळींच्या अनेक वस्त्या मुंबईबाहेर वसू लागल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

नशेचे नवे पर्याय...
नशीला मशरूम 

तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी रासायनिक अमली पदार्थांसह परदेशातील पारंपरिक अमली पदार्थ भारतात आणले. त्यात मॅजिक मशरूमचाही समावेश आहे. दक्षिण अमेरिका, मेक्‍सिको व इंडोनेशियातील बंदी असलेले अमली पदार्थ नुकतेच कोलकत्ता येथे हस्तगत करण्यात आले. या वेळी डिस्क जॉकीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २.४९ ग्रॅम मॅजिक मशरूम, २० एलएसडी ब्लॉट्‌स, ९ गोळ्या (एमडीएमच्या) व १३.५ ग्रॅम इक्‍टसीसारखा पदार्थ हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत विवेक शर्मा, रिषभ शर्मा व डिक्‍स जॉकी दीप चक्रवर्ती यांना अटक झाली आहे. आळंबी अर्थात मशरूमपेक्षा याची चव थोडी कडू लागते. एवढाच त्यामधील फरक आहे. त्यामुळे इतर खाद्यपदार्थ अथवा चॉकलेट सिरप त्यावर टाकून त्याचे सेवन केले जाते. त्याची नशा तब्बल आठ तास राहते. रासायनिक अमली पदार्थ एमडी व एलएसडीपेक्षाही ती अधिक काळ असते. बिटकॉईनद्वारे डार्कनेटवरून त्याची खरेदी करण्यात येत होती. त्यांची विक्री पार्ट्यांमध्ये करण्यात येत होती.

मशरूमच्या दोन हजार जातींपैकी १४४ जातींमध्ये नशा देणारा घटक असतो. त्यामुळे अमेरिका खंडानंतर गेल्या काही वर्षांत पूर्व आशियात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत मॅजिक मशरूमवर बंदी घातली आहे. भारतात या मशरूमवर बंदी नाही, पण त्यातील नशेच्या घटकांवर बंदी आहे.

बाजारात नवनवीन अमली पदार्थ आणण्याकडे तस्करांचा कल असतो. कोलकत्ता युनिटने नुकतेच मॅजिक मशरूम हस्तगत केले. देशातील ही पहिली कारवाई आहे.
- अशोक जैन, उपमहासंचालक, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक

स्पाईसचे वेड
युरोपमधील हजारो तरुण-तरुणी स्पाईसच्या विळख्यात आहेत. आता ते आपल्या देशातही मिळत आहे. गांजावर विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करुन ते तयार करण्यात येते. कृत्रिम गांजा असलेल्या या अमली पदार्थाचा अंश वैद्यकीय चाचणीत सापडत नसल्यामुळे विशेषत: तरुणी त्याच्या आहारी गेल्या आहेत. पोलिसांकडे यासंदर्भात एकही गुन्हा दाखल नसला, तरी त्याचे सेवन करणारे अनेक तरुण-तरुणी वैद्यकीय उपचारासाठी तज्ज्ञांकडे येत आहेत. त्यावरून त्याची किती चलती आहे हे लक्षात येते. स्पाईस हे के टू, ब्लॅक मांबा, ब्लॅक झोंबी या नावाने प्रचलित आहे. ते इंग्लंडमध्ये फार प्रचलित झाले होते. मुंबईतही अनेक तरुण-तरुणी या कृत्रिम गांजाला बळी पडत आहेत. तीन महिन्यांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्याची मुलगी या अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे उघड झाले होते. तिच्या आईने संशय व्यक्त केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नसल्याचे ठामपणे सांगितले होते. त्या वेळी ती वैद्यकीय चाचणीलाही तयार झाली होती. भायखळा येथील मसिना रुग्णालयात ती अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची लक्षणे आढळली. समुपदेशन केल्यानंतर तिने स्पाईसचे सेवन करत असल्याची कबुली दिली. स्पाईसचे दुष्परिणाम फार भयानक आहेत. त्याचे अतिसेवन झाल्यास माणूस एखाद्या झोंबीप्रमाणे म्हणजे निर्जीव वस्तूसारखा पडून राहतो, त्यामुळे हे ड्रग्स झोंबी म्हणून प्रसिद्ध आहे. अतिसेवनामुळे संबंधिताला वेडही लागण्याची शक्‍यता असते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉक्‍टर प्रियांका महाजन यांनी सांगितले.

गांजाचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्याचे अंश सुमारे २० दिवस सापडतात, पण स्पाईस कृत्रिम अमली पदार्थ असल्यामुळे त्याचा अंश सापडत नाही.
- डॉ. प्रियांका महाजन, मानसोपचारतज्ज्ञ

वृत्त संकलन  - अनिश पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black world of drugs