ठाणे जिल्ह्यात रॉकेलची नाकाबंदी 

संग्रहित
संग्रहित

टिटवाळा : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड व शहापूर तालुक्‍यात ऑगस्ट महिन्यापासून रॉकेलचा शिधा पत्रिकेवरील पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे गरीब आदिवासी, कातकरी कुटुंब यामुळे प्रभावित झाले असून, रॉकेल मिळत नसल्याने 30 हजारांहून अधिक ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. घरात रॉकेल नाही आणि गॅसही नाही, अशा परिस्थितीत या कुटुंबांना सरपण वापरून चुली पेटवाव्या लागत आहेत. प्रत्येक गरीब लाभार्थ्याला गॅस पुरवठा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गॅस एजन्सीचालकांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतल्याची चर्चा या कुटुंबांत सुरू आहे. 

कल्याण तालुक्‍यात महिन्याला 60 हजार लिटर केरोसिनचा पुरवठा यापूर्वी केला जात होता; तर मुरबाड व शहापूर तालुक्‍यात एक लाख 70 हजार लिटरहून अधिक रॉकेलचा पुरवठा होत होता. मात्र, तीन महिन्यांपासून हा पुरवठा शिधावाटप दुकानात केला जात नाही. ग्रामीण भागात सध्या विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. रात्र-रात्र वीज नसते. या स्थितीत घरात रॉकेल नाही आणि वीजही नसल्याने रात्र अंधारात घालवावी लागत आहे. 

कल्याण, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्‍यांत रॉकेलचा पुरवठा बंद असला तरी अंबरनाथ, भिवंडी व उल्हासनगर तालुक्‍यांत रॉकेलचा पुरवठा सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी राजू धोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, गौरी-गणपती सण आणि दसरा-दिवाळी सणही अंधारात गेला. त्यामुळे रॉकेलचा पुरवठा लवकरच केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे. 

कल्याण तालुक्‍यात 876 उज्ज्वला गॅस नसणारे कुटुंब आहेत. या कुटुंबांना रॉकेल देण्यात यावे यासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठविला आहे. 
- सीमा दुतारे, 
पुरवठा अधिकारी, 
कल्याण तालुका 

कल्याण, शहापूर, मुरबाड या तीन तालुक्‍यांत दीडशेहून अधिक रॉकेल परवानाधारक विक्रेते आहेत. त्यांच्याकडे 30 हजारांहून अधिक रॉकेलचा नियमित वापर करणारे ग्राहक आहेत. मात्र, तीन महिन्यांपासून परवानाधारक विक्रेत्यांकडे मागणी करूनही रॉकेल मिळत नाही. रॉकेल पुरवठा बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. 
- सुदाम वाघे, ग्राहक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com