BLOG: कोरोनाचा इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला जबर फटका; तर चीनची जागा घेण्याची सुवर्णसंधीही

कृष्ण जोशी
रविवार, 3 मे 2020

कोरोनामुळे केवळ जगाचे, देशाचेच नव्हे तर सर्वसामान्यांपासून ते उच्चमध्यवर्गीयांचे अर्थकारणही ढासळणार आहे. त्याचा सर्वात पहिला मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला बसणार आहे.

कोरोनामुळे केवळ जगाचे, देशाचेच नव्हे तर सर्वसामान्यांपासून ते उच्चमध्यवर्गीयांचे अर्थकारणही ढासळणार आहे. त्याचा सर्वात पहिला मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीला बसणार आहे. अनेकांच्या नोकऱ्या, वेतन, उत्पन्न यावर परिणाम झाला आहे वा लवकरच होणार आहे. त्यामुळे अगदी उंची मोबाईलपासून ते संगणक, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव्ह यांच्या खरेदीचे विचार पुढे ढकलले जाणार आहेत. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षे किमान पंधरा ते सतरा टक्के वाढ दाखवणारे हे क्षेत्र या किंवा पुढच्या वर्षीही विक्रीत घट दाखवण्याची शक्यता आहे.

गेले एक दोन वर्षे वाहन क्षेत्र मंदीत असले तरी इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्राची कमान मात्र चढतीच होती. मोबाईल, फ्रीज, टीव्ही, मायक्रोवेव्ह या वस्तूंखेरीज सध्या आपले पानही हलत नाही, अशी स्थिती आहे. वाढती अर्थव्यवस्था आणि वाढत्या लोकसंख्येसाठी या वस्तू मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने या उद्योगांनाही सुगीचे दिवस आले होते. मात्र यावर्षी हे चित्र बदलण्याची भीती आहे. अर्थात कोरोनाची एक चांगली बाजू म्हणजे या क्षेत्रातही चीनची जागा घेण्याची सुवर्णसंधी आपल्यासमोर चालून आली आहे, महाराष्ट्र देखील यात वाटा उचलू शकतो, असे जाणकार सांगतात.

इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार वर्ष 2016-17 मधील इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर इंडस्ट्रीतील उत्पादन 47 अब्ज डॉलर होते तर देशांतर्गत उलाढाल (आयात मालासह) 87 अब्ज डॉलर होती. त्याचवर्षी देशातून या वस्तूंची झालेली निर्यात सहा अब्ज डॉलर एवढी होती. या क्षेत्राची दरवर्षी वाढ 25 टक्के होती. 2017-18 मध्ये देशात एक कोटी 60 लाख एलसीडी-एलईडी टीव्हीसंचांचे उत्पादन झाले, जे त्याच्या आधीच्या वर्षीपेक्षा दहा टक्के जास्त होते. एसी, फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन यांच्या उत्पादनातील वाढही 17 टक्के होती. उद्योगधंद्यांना लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादनही या वर्षात 11 टक्के वाढले, तर 2018-19 या वर्षात त्यात 19 टक्के वाढ झाली असावी असा अंदाज आहे. फ्लॅट टीव्हींच्या मागणीत गेल्या पाच वर्षांत प्रचंड वाढ झाली असताना डेस्कटॉपच्या मागणीत घट होत आहे. गेल्या तीन वर्षांत देशात मोबाईल दूरध्वनी संचांचे उत्पादन करणाऱ्या सव्वाशे कंपन्या निर्माण झाल्या. त्यातील 59 कंपन्या प्रत्यक्ष मोबाईल तर उरलेल्या कंपन्या बॅटरी, हेडसेट, चार्जर, केबल आदी मोबाईलला लागणाऱ्या अन्य वस्तू बनवतात.

या वस्तूंच्या आयात-निर्यातीत प्रचंड तफावत आहे. आपली निर्यात संथपणे वाढते आहे. डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शिअल इंटॅलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स तर्फे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2015-16 मध्ये देशातून 39 हजार कोटी रुपयांची सामुग्री निर्यात झाली. पुढील वर्षी हाच आकडा 39 हजार 979 कोटी रुपये एवढा होता. तर 2015-16 मध्ये देशाने दोन लाख 68 हजार 105 कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक सामुग्री आयात केली. त्याच्या पुढच्या वर्षीचा आकडा दोन लाख 87 हजार 558 कोटी रुपये होता.

मार्च ची विक्री निम्मी
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये होम अप्लायन्स म्हणजे टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, ओव्हन या घरगुती वस्तूंची बाजारपेठ सर्वात मोठी आहे. या गोष्टींचे अग्रगण्य उत्पादक गोदरेज अप्लायन्स चे प्रमुख कमल नंदी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात दरवर्षी या वस्तूंच्या एकूण विक्रीपैकी साठ टक्के विक्री फेब्रुवारी ते जून या महिन्यांमध्येच होते. या प्रत्येक महिन्यात 12 टक्के विक्री होते. नंतर पावसाळा व हिवाळा यादरम्यान विक्री मंद (दसरा, दिवाळी, न्यू इयरचा अपवाद वगळता) असते. मात्र यावेळी मार्च महिन्यात नेहमीपेक्षा निम्मीच विक्री झाली व एप्रिलमध्ये तर विक्रीचा प्रश्नच उद्भवला नाही. आता मे महिन्यातही लॉकडाऊन लांबल्याने लोक राहिलेल्या खरेदीसाठी जूनमध्ये झुंबड करतील, अशी भाबडी आशा काही व्यावसायिकांना आहे. मात्र ग्राहकांच्या अर्थकारणाचे गणित कोलमडल्याने ते स्वप्नच राहणार आहे याची जाणीव धंद्यातील मुरलेल्या व्यक्तींना झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांखेरीज अन्य इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या लॉकडाऊनमुळे बंदच आहेत. नाहीतरी चीन, तैवान, मलेशिया, दक्षिण कोरिया आदी ठिकाणांहून येणारा कच्च्या मालाचा पुरवठाही बंद झाला आहे. देशात आयात होणारा इलेक्ट्रॉनिक्ससाठीचा 40 टक्के कच्चा माल मुंबई बंदरात येतो व तेथून तो देशभर जातो. मुंबई बंदरही बंदच असल्याने हा साराच पुरवठा विस्कळित झाला आहे. राज्यातील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमधील कर्मचारी बहुतांश स्थानिक आयटीआय शिकलेले असल्याने लॉकडाऊननंतर उद्योग सुरु करताना तो प्रश्न येणार नाही.

काळ्या ढगाला रुपेरी किनार
सध्याची स्थिती निराशाजनक असली तरी ही स्थिती कायम राहणारी नाही, उलट वर्षादोन वर्षात सारे काही सुरळित झाले ही या क्षेत्राला उज्वल भवितव्य आहे. हे झाले देशांतर्गत बाजारपेठेचे, पण सध्याची जागतिक स्थिती बघता या क्षेत्रात चीन ला टक्कर देऊन चीनला स्पर्धा करण्याचीही आपल्याकडे क्षमता आहे. फक्त यासाठी सरकारने या क्षेत्राला आवश्यक ते साह्य केले पाहिजे, असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँड अग्रीकल्चर चे अध्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योजक संतोष मंडलेचा यांनी 'सकाळ' ला सांगितले. 

इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तंत्रज्ञान महत्वाचे असते, त्यासाठी सरकारने तत्काळ अनुदान दिले पाहिजे. नाशिकसारख्या शहरात इलेक्ट्रॉनिक्स हब करता येईल. इलेक्ट्रॉनिक्स हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असून त्याशिवाय आपण जगूच शकणार नाही. त्यामुळे आपले या क्षेत्रातील भवितव्य उज्वल आहे, मात्र मंदीतील ही संधी आपण साधायला हवी. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी चांगली आहे, आपले कुशल मनुष्यबळ व तांत्रिक ज्ञान या जमेच्या बाजू आहेत. यांचा दर्जा अजून वाढवला तर महाराष्ट्राला या क्षेत्रात चांगले दिवस येऊ शकतील. हा दर्जा वाढविण्यासाठी सरकारने अनुदान देऊन विशेष प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले.

आपण कच्चा माल आणि तयार वस्तू यांच्यासाठी बऱ्याच प्रमाणात चीनवर अवलंबून आहोत. आपल्याला या क्षेत्रात खरी मजल मारायची असेल तर कच्च्या मालाच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. आपल्याला चिनी माल स्वस्त मिळतो, तरी त्यावरील अवलंबित्व कमी करून स्वयंपूर्णतेवर भर दिला पाहिजे. यामुळे भारताला होणारा दीर्घकालीन लाभ ध्यानात घेता सरकारने प्रमुख भुमिका बजावली पाहिजे. ज्याप्रमाणे चीन उद्योजकांना पायाभूत व अन्य सोयी, भांडवली गुंतवणूक देते तशी स्कीम भारत सरकारने केली पाहिजे. यासंदर्भातील समितीवर उद्योजक, तज्ञ आदींचा समावेश करावा, त्यात केवळ सरकारी बाबू घेतले तर त्या योजना व्यवहार्य होत नाहीत, असा अनुभव असल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

आज जगाचा चीनवरून विश्वास उडाला असल्याने चीनमधून बाहेर पडू पाहणारे उद्योगधंदे मिळविण्याची आपल्यासमोर मोठी संधी आली आहे. त्यामुळे त्या उद्योगांची व त्या मालाची बाजारपेठ भारत होऊ शकेल. मात्र जगाला लागणारा माल पुरविण्यासाठी आपण समर्थ होण्याची तयारी करावी लागेल. यात केंद्र व राज्य सरकार यांना प्रमुख भूमिका बजावावी लागेल. त्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठीच्या विशेष धोरणावर व्यवस्थित काम करायला हवे. पायाभूत सुविधांचा विकास, भांडवली गुंतवणुक, तंत्रज्ञान विकासासाठी अनुदान या गोष्टींवर भर द्यावा, असेही मंडलेचा म्हणाले.

नोकरदारांनी भान ठेवावे
गेली काही वर्षे या क्षेत्रात दरवर्षी पंधरा ते सतरा टक्के वाढ होती, आता लोकांची क्रयशक्ती 30 ते 35 टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्राची वाढ कमी होईल, लोक फक्त खऱ्या गरजेच्याच वस्तू घेतील. अर्थात दोन वर्षांत पुन्हा चांगले दिवस येतील. आपल्याकडचे उत्तम तंत्रज्ञ व तंत्रज्ञान यांच्यासाह्याने मोठ्या प्रमाणात उत्पादनाची क्षमता विकसित केली तर आपण चीनपाठोपाठ दुसरे उत्पादनाचे हब बनू शकतो. 

कोरोनामुळे या क्षेत्रातल्या नोकऱ्यांवर थोडाफार परिणाम होईल, पण नोकऱ्या जातीलच असे नाही. एकंदर बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासनाने पायाभूत सुविधांच्या कामावर जास्त खर्च करावा, त्यामुळे उत्पादकता वाढून स्थानिक बाजारपेठेचीही वाढ होईल. सध्याच्या स्थितीत कामगारांनाही योगदान द्यावे लागेल, काही प्रमाणात त्यांनाही कामे व पगारकपात यांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्याला यावर्षी जी अर्थव्यवस्था व सुखसोयी अपेक्षित होत्या, त्या कदाचित दोन वर्षे मिळणार नाहीत, त्यामुळे कोठेतरी तडजोड अनिवार्य होणार आहे, तरच हा समन्वय साधला जाईल -
संतोष मंडलेचा, संचालक (प्रोप्रायटर) रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स.
अध्यक्ष – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blog written by krushn joshi Corona hits the electronics industry