मुंबईत तब्बल 206 अनधिकृत शाळा, मान्यता न घेताच विद्यार्थ्यांना शिक्षण

मुंबईत तब्बल 206 अनधिकृत शाळा, मान्यता न घेताच विद्यार्थ्यांना शिक्षण

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये तब्बल 206 शाळांनी सरकार आणि महापालिकेची मान्यता न घेताच शाळा सुरू केल्या आहेत. या शाळा तातडीने बंद करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच संबंधित शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मनपा किंवा खासगी शाळेत दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची मान्यता बंधनकारक आहे. यानंतरही सरकारी नियमांकडे दुर्लक्ष करत काही संस्थाचालक शाळा चालवत आहेत. सरकारी नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यानंतरही संस्थाचालक शाळा सुरूच ठेवतात. दरवर्षी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून बेकायदा शाळांची यादी जाहीर होते. 2018-19 या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शिक्षण विभागाने 231 बेकायदा शाळांची यादी जाहीर केली होती. तर 2019-20 या शैक्षणिक वर्षात 211 शाळा बेकायदा जाहीर केल्या होत्या. यंदा या शाळांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा 206 शाळा बेकायदा म्हणून जाहीर केल्या आहेत. या शाळांमधील बहुतांश शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. अनधिकृत शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळील मनपा किंवा मान्यताप्राप्त खासगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

अनधिकृत ठरविलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमासह हिंदी, मराठी, उर्दू या तीन भाषेच्या शाळांचीच संख्या अधिक आहे. पालिकेच्या एम/पूर्व विभागामध्ये म्हणजेच मानखुर्द, गोवंडी परिसरामध्ये सर्वाधिक 67 बेकायदा शाळा आहेत. त्याखालोखाल पी/ नॉर्थ म्हणजेच मालाड-मालवणी, पठाणवाडी या परिसरात 18 शाळा, एस वॉर्ड  म्हणजे विक्रोळी-भांडूप परिसरात 15, एफ/नॉर्थ म्हणजे वडाळा, अ‍ॅटॉप हिल, सायन कोळीवाडा या भागामध्ये 14, एल म्हणजे कुर्ला भागामध्ये 12, आर/साऊथ म्हणजे कांदिवलीमधील 10 शाळा बेकायदा असल्याचे पालिकेकडून घोषित करण्यात आले आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc announcement 206 unauthorized schools Mumbai Education without approval

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com