BMCचा अर्थसंकल्प सादर होण्याआधी घडली ही विचित्र घटना, काय घडलंय वाचा

सुमित सावंत
Wednesday, 3 February 2021

 मुंबई महानगर पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार थोडक्यात बचावले आहेत. आज रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायल्याची घटना घडली आहे. 

मुंबई:  मुंबई महानगर पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार थोडक्यात बचावले आहेत. आज रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायल्याची घटना घडली आहे. 

आज बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे अर्थसंकल्पीय अंदाज (अर्थसंकल्प इ)  सादर केला. यावेळी सहआयुक्त रमेश पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पाणी समजून समोर ठेवलेल्या बाटलीतील सॅनिटायझर प्यायले. मात्र सॅनिटायझर असल्याचं त्यांना तात्काळ समजल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. सॅनिटायझर प्यायल्याचं समजताच रमेश पवार हे लगेचच सभागृहाबाहेर जाऊन तोंड धुवून परत सभागृहात आले.

मुंबई महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२१-२२ चे अर्थसंकल्पीय अंदाज (अर्थसंकल्प इ) शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिक्षण समिती अर्थसंकल्प

यंदा २९४५.७८ कोटींची तरतूद शिक्षण विभागासाठी करण्यात आली असून तितक्याच उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागच्या वर्षी २९४४.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यावेळी त्यात १.१९ कोटींची वाढ करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी

  • कोविड आरोग्य विषयक संसाधनांसाठी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी १५.९० कोटींची तरतूद करण्यात आली असून हँड सॅनिटायझर, साबण, हँड वॉश पुरवले जाणार आहेत. 
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे "मुंबई पब्लिक स्कूल" असं नामकरण करून नवीन बोधचिन्ह दिलं जाणार आहे. जनतेत सकारात्मक दृष्टिकोन व्हावा याकरिता ही योजना आखण्यात आली आहे. यात प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कूल करण्यात आली असून त्याचा वापर सर्व शाळांसाठी करण्यात येणार आहे. 
  • उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी  करिअर कॉन्सलिंग कार्यक्रम व्हॉट्सअॅप आणि चॅट बोटद्वारे राबवणार. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मे २०२१ पासून `करिअर टेन लॅब´या संस्थेमार्फत नियोजन. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केलं जाईल यासाठी तब्बल २१.१० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
  • CBSC बोर्डाच्या २ शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता मुंबई शहरात २, पश्चिम उपनगरात ३, पूर्व उपनगरात ५ , अशा मिळून १० शाळा ज्युनियर केजी ते ६ वीपर्यंत सुरू होतील. त्यासाठी २ कोटींची करण्यात आली आहे.
  • मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंसाठी ८८ कोटींची तरतूद केली आहे.
  • 25 माध्यमिक शाळांमध्ये टिकरिंग लॅब- विचारशील प्रयोगशाळा सुरु होणार आहे. यात विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक साहित्याची मांडणी करुन प्रयोग करु शकतील. यासाठी ५.३० कोटींची तरतूद करण्यात आली.
  • संगीततज्ज्ञ मयुरेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एम. जोशी मार्ग महापालिका शाळेत "मॉडेल संगीत केंद्र" उभारणार आहे. यात स्मार्ट टिव्ही, प्रोजेक्टर, क्रोम कास्ट, वायफाय या सेवा पुरवल्या जातील. त्यासाठी तरतूद १० लाख रुपये केली आहे.
  • महापालिका शाळेतील १३०० वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद २८.५८ कोटी करण्यात आली आहे.
    -----------------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BMC Budget 2021 22 Joint Commissioner Ramesh Pawar Drink sanitizer


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC Budget 2021 22 Joint Commissioner Ramesh Pawar Drink sanitizer