मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढवणाऱ्या 'या' आहेत ११ केसेस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

प्रभादेवीच्या एका चाळीत राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ती फूड वेंडरचं काम करत होती. तिच्याकडून कार्पोरेट कंपन्यामधले कर्मचारी जेवण घेत होते. २४ मार्चला तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या दोन दिवसानंतर २६ मार्चला तिचा मृत्यू झाला.

मुंबई: मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. मुंबईत सर्वात जास्त कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. त्यात दक्षिण मुंबईतल्या जी-दक्षिण वॉर्डात आतापर्यंत कोरोनाच्या तब्बल ११३ केसेस समोर आल्या आहेत. यातल्या ११ इंडेक्स केसेसची प्रशासनानं ओळख पटवली आहे. या ११ इंडेक्स केसेसमधील लोकांना बाहेरच्या लोकांकडून कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांच्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या ११ लोकांमुळे वरळी-प्रभादेवी परिसरातल्या तब्बल १०२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे.

या आहेत मुंबईतील ११ इंडेक्स केसेस:

(१) प्रभादेवीच्या एका चाळीत राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ती फूड वेंडरचं काम करत होती. तिच्याकडून कार्पोरेट कंपन्यामधले कर्मचारी जेवण घेत होते. २४ मार्चला तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या दोन दिवसानंतर २६ मार्चला तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेच्या संपर्कामुळे तिच्या कुटुंबातील लोकांसोबतच शेजाऱ्यांना अशा १२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. या सर्वांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

(२) मार्चमध्ये एक व्यक्ती ओमानवरून वरळी कोळीवाड्यात आला होता. त्याला कोरोनाचे कोणतेही लक्षणं दिसत नव्हते. त्याच्या  पहिल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्याची तिसरी टेस्ट करण्यात आली. त्यात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळे वरळी कोळीवाड्यात या व्यक्तीमुळेच संसर्ग पसरला असावा असं बोललं जातंय

(३) ट्रॉम्बेच्या एका पब्लिक सेक्टर कंपनीत शेफ म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या वरळीतल्या  ७ जणांना कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं.

मोठी बातमी - गेले 8 महिने पगार आलेला नाही; मात्र कोरोनात कर्तव्य बजावून काम करतात

(४) वरळीच्या आदर्श नगरमध्ये एक डॉक्टर आणि दोन नर्सेसला कोरोनाची लागण झाली. या डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये संसर्ग  झाला असेल त्यामुळे त्याचे कर्मचारीही संक्रमित झाले असतील असं अधिकाऱ्यांना वाटतं.

(५) दक्षिण मुंबईत एका डॉक्टरच्या एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका टेक्निशियनलाही कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती वरळी कोळीवाड्यातला रहिवासी आहे. याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण झाली आहे. या टेक्निशियनमुळे वरळीत अधिक संसर्ग पसरला असं बोललं जातंय. 

(६) वरळीच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हा पोलीस कर्मचारी लोणावळ्याला गेला होता. तो त्याच्या भावााच्या अंत्यसंस्कारातही सहभागी झाला होता. त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबातील २ लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

(७) वरळीच्या जिजामाता नगरमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेची कोरोना टेस्ट मार्चमध्ये पॉझिटिव्ह आली होती. या महिलेमुळे तिच्या १० शेजाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र ही महिला कोणाच्या संपर्कात आली नाही तरी तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

मोठी बातमी - CM उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला 'आज' केलेल्या ३ मोठ्या आणि महत्त्वाच्या सूचना

(८) वरळीच्या जिजामाता नगरमध्ये एका सफाई कामगाराला कोरोनाची लागण झाली होती.  धारावीत राहणाऱ्या व्यतीच्या संपर्कात आल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली. धारावीत एकूण ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या सफाई कामगारामुळे जिजामाता नगरमध्ये  ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

(९) जिजामाता नगरमध्ये राहणारा आणि मुंबईच्या एका रुग्णालयात आचारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली होती. त्याला रुग्णालयातच कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आचाऱ्याच्या घरातल्या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

(१०) लोअर परळ येथे राहणारा एक ज्येष्ठ नागरिक स्पेनवरून आला होता. मुंबईत आल्यावर त्याने स्वत:ला होम क्वॉरंटाइन केलं होतं. मात्र मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. स्पेनमध्येच तो करोनाग्रस्ताच्या संपर्कात आला होता. या व्यक्तीनं वेळीच स्वत:ला होम क्वॉरंटाईन केल्यामुळे कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही.

(११) वरळीच्या आदर्शनगरमध्ये राहणारा एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो मुलुंडच्या एका खासगी रुग्णालयात  काम करत होता. त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबात एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.

bmc has identified eleven index cases of covid 19 in mumai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc has identified eleven index cases of covid 19 in mumai