मुंबई : गणेश विसर्जनासंदर्भात BMC चे निर्देश, मूर्तींवर ‘पीओपी’ उल्लेख बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshotsav

मुंबई : गणेश विसर्जनासंदर्भात BMC चे निर्देश, मूर्तींवर ‘पीओपी’ उल्लेख बंधनकारक

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजिनक मंडळे तयारीला लागली आहे. यंदाच्या वर्षी पीओपीचा कमी वापर आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेचे लक्ष्य आहे. गणपती विसर्जनासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ३ ते ४ असे सुमारे १०० कृत्रीम तलाव तयार केले जाणार आहे. प्रत्येक वॉर्डांचा आढावा घेऊन याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहे. गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक सोमवारी पार पडली. पालिका प्रशासनाकडून यावर्षासाठी ‘पीओपी’च्या मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. शिवाय कोरोना आटोक्यात असल्यामुळे निर्बंधांचे बंधन नसल्याचे संकेत देण्यात आल्याने यावर्षी धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीला उपनगर गणोशोत्सव समन्वय समितीचे विनोद घोसाळकर, ‘लालबागचा राजा’ मंडळाचे सुधीर साळवी, आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे परवानगीसाठीचे १०० रुपयांचे शुल्क पालिकेने माफ केले होते. मात्र यावर्षी हे शुल्क मंडळांना भरावे लागणार आहे

खड्डे वेळेत बुजवा, धोकादायक फांद्या तोडा

गणेशोत्सव सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी आहे. मात्र मोठ्या मंडळांच्या मंडपात काही दिवस आधी मूर्तींचे आगमन होते. या दरम्यान देखाव्यांचे कामही सुरू होते. या पार्श्वभूमीवर मंडप असलेला परिसर, गणेश आगमन, मिरवणुकांच्या मार्गातील झाडांच्या फांद्या तोडाव्यात, खड्डे भरण्याची कामे वेळेत पूर्ण करावी असे निर्देशही आजच्या बैठकीत संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.

पीओपीचा उल्लेख बंधनकारक

कोविड कालावधीनंतर होणा-या यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. तथापि, अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून तयार करण्यात आलेल्या घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमूद करणेही बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणा-यांना ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची श्री गणेश मूर्ती ओळखणे सुलभ होईल, अशीही माहिती श्री. काळे यांनी बैठकी दरम्यान दिली. त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान घरगुती श्री गणेश मूर्तींची उंची ही २ फुटांपेक्षा अधिक नसावी, तर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांसाठीच्या श्री गणेश मूर्तींची उंची ही शक्य तेवढी कमी असावी, असेही आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Web Title: Bmc Instructions Regarding Immersion Of Ganesha Mention Of Pop On Idols Is Mandatory Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..